नागपूर : भावाच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. संघर्ष मेश्राम (वय २६, जयताळा) असे मृताचे नाव असून शुभम ऊर्फ बॉबी सुखसागर साहू (२०) व शाहरूम पटेल मो. कुर्बान (२४) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मागील पाच दिवसांतील खुनाची ही तिसरी घटना आहे.
बॉबी आणि शाहरूम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. संघर्षच्या मित्राचा बॉबीचा भाऊ अक्षयसोबत काही काळापूर्वी वाद झाला होता. संघर्षच्या मित्राने अक्षयला बेदम मारहाण केली होती. यावरून त्यांच्यात खडाजंगी झाली. मंगळवारी सायंकाळपासून आरोपी दारूच्या नशेत फिरत होते. सुभाष नगर मेट्रो स्थानकाजवळ आरोपींना संघर्ष भेटला. दोघांनीही संघर्षला अक्षयला मारहाण करणाऱ्या मित्राला फोन करायला सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून संघर्षने त्याच्या मित्राला फोन करून तिथे बोलावले. दोघेही अक्षयला मेट्रो स्टेशनच्या मागे असलेल्या घनदाट झाडांच्या भागात घेऊन गेले.
रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी बोलवत असल्याने संघर्षच्या मित्राला शंका आली व त्याने येण्यास नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने संघर्षसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली व त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. संघर्षची जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याचे डोके दगडाने ठेचले. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी व प्रतापनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अक्षयच्या मित्राकडून पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
पाच दिवसांत तीन हत्या
मागील पाचव्या दिवसातील ही तिसरी हत्या ठरली. १४ जुलै रोजी शंकरनगर चौकात सरोज ऊर्फ सोनू याची पेट्रोलपंपवर पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून हत्या करण्यात आली. १८ जुलै रोजी सकाळी पाचपावलीत दीक्षित जनबंधू या आरोपीने आसिफ खानची दगडाने ठेचून हत्या केली. मंगळवारच्या हत्येतदेखील दगडानेच ठेचण्यात आले.
अंधारात पोलिसांची परीक्षा
संघर्षची हत्या ज्या भागात झाली तेथे अंधार होता. मुख्य रस्त्यापासून हा भाग बराच आत होता. घटनास्थळावर चिखलात वाट तुडवत पोलिसांना पोहोचावे लागले. तेथून त्याचे शव उचलून आणण्यातदेखील अडचण आली. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पोलिसांनी घटनास्थळापासून सुभाषनगर बसस्थानकाजवळ त्याचे शव आणले.