एकाच रात्रीत तीन घटना : उपराजधानीत खळबळनागपूर : बुधवारी रात्री उपराजधानीत एकाची हत्या आणि दोघांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले. अजनी, तहसील आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. अजय भाऊराव खोब्रागडे (वय अंदाजे ४० ते ४५) असे मृताचे नाव असून, तो रिक्षा चालवीत होता. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुलखेडा भागात राहणाऱ्या खोब्रागडेला दोन मुले आहेत. त्यातील एका मुलाचा गुरुवारी दहावीचा पेपर होता. त्याचा मोठा भाऊ रंजित खोब्रागडे याच्याकडे ती राहतात. अजय आठवड्यातून एक-दोनदा त्यांना भेटायला जात होता. दिवसभर रिक्षा चालवून बाहेरच जेवायचे अन् बाहेरच झोपायचे, अशी त्याची सवय होती. त्याला दारूचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री तो मेडिकल चौकाजवळच्या पांडव कॉम्प्लेक्ससमोर झोपला होता. गुरुवारी सकाळी खोब्रागडेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती कळताच अजनी पोलीस पोहोचले. अजयच्या डोक्यावर फरशी किंवा सिमेंटच्या फळीने मारून त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. या प्रकरणी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गार्ड लाईन रेल्वे वसाहतीत शैलेंद्र चिंधूजी घोरपडे याच्यावर तलवारीचे घाव घालून चौघांनी त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. त्याच्या मदतीला धावलेल्या त्याच्या दोन भावानांही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. बुधवारी रात्री शैलेंद्रच्या घरी एक कार्यक्रम सुरु होता. आरोपी सोनू किशोर पौनीकर, छन्नू, दादू आणि मोंटी हे सशस्त्र गुन्हेगार रात्री १०.३० वाजता तेथे आले. त्यांनी योगेंद्र चिंधूजी घोरपडे (वय १८) याच्यासोबत विनाकारण वाद सुरू केला. ते शिवीगाळ करीत असल्याचे पाहून योगेंद्रचा भाऊ शैलेंद्र त्यांना समजावण्यासाठी पुढे आला. आरोपींनी त्याच्या पोटावर तलवारीचे घाव घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते पाहून त्याचे रवींद्र आणि शुभम हे दोन भाऊ मदतीसाठी धावले असता आरोपींनी त्यांच्याही हातापायावर तलवार मारून जखमी केले. जखमींना मेयोत दाखल करण्यात आले. योगेंद्रच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. कळमन्यात रात्री ९.३० वाजता अशीच घटना घडली. साखरकर वाडी रेल्वे लाईनजवळ आरोपी अर्जुन बिहारी यादव (वय २२) आणि सुनील नामक अन्य एका आरोपीने मनोज सुखलाल शाहू (वय २५, रा. कुंजाराम वाडी) या तरुणावर घातक शस्त्राचे वार केले आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजचा भाऊ करण सुखलाल शाहू (वय २१) याने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
एकाची हत्या, दोघांच्या हत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 10, 2017 2:50 AM