नांद/बेसूर (नागपूर) : गावातील महिलांना त्रास देणे, विनाकारण मारहाण करणाऱ्या गावगुंडाशी तरुणांचे शुक्रवारी (दि. २८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात तिघांनी त्याला लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा उपचाराला नेताना मृत्यू झाला. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे घडली असून, दाेन आराेपींना अटक केली, तर एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.
सुनील घनश्याम शंभरकर (३५), असे मृत गावगुंडाचे, तर आनंद नामदेव पाटील (२०) व प्रज्वल नरेश मोरे (२५), अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. या दाेघांसाेबत १७ वर्षीय विधिसंषर्घग्रस्त बालकास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे चाैघेही चिखलापार, ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. सुनीलला दारूचे व्यसन असल्याने ताे दारूच्या नशेत नेहमीच भांडण करणे, महिलांना त्रास देणे, तरुणांना शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या प्रकारामुळे नागरिक त्रासले हाेते.
दाेन दिवसांपासून सुनील कुणाच्याही घरात शिरायचा व नासधूस करायचा. ताे शुक्रवारी सकाळी दारूच्या नशेत शोभा नामदेव पाटील या घरी एकट्याच असताना सुनील त्यांच्या घरात शिरला आणि साहित्याची फेकाफेक केली. त्यांनी आरडाओरड करताच त्याने तिथून पळ काढला व नरेश माेरे यांच्या घरात शिरून नासधूस केली. त्यामुळे आनंद, प्रज्वल व त्यांच्या मित्राने सुनीलला पकडून विचारणा केली. त्याने तिघांवर हल्ला चढविताच तिघांनी त्याला लाकडी दांड्यांनी मारहाण केली. जखमी झाल्याने पाेलिस पाटलाने त्याला उपचारासाठी नागपूरला नेले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, तिघांनी सिर्सी पाेलिस चाैकी गाठून सुनीलविराेधात तक्रार नाेंदविण्याचा प्रयत्न केला. ताेपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याने पाेलिसांनी त्या तिघांविरुद्ध भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेघांना अटक केली व एकास ताब्यात घेतले. पाेलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी बेला पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत काही साहित्य जप्त केले.
माजी सरपंचावर कुऱ्हाड हल्ला
सुनील शंभरकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा हाेता. त्याने २०१४ मध्ये तत्कालीन सरपंच सविता नत्थू मून यांच्यावर विनाकारण कुऱ्हाडीने हल्ला चढविला हाेता. त्यात सविता गंभीर जखमी झाल्या हाेत्या. या प्रकरणात बेला पाेलिसांनी सुनीलच्या विराेधात भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली हाेती. ताे सतत चाकू बाळगायचा. चाेऱ्या, वाटमारी व लुटमार करायचा.