नागपूर : कारागृहातून पळून गेलेल्या पाच कच्च्या कैद्यांपैकी मोक्काच्या तीन खतरनाक कैद्यांचा बॉस राजा ऊर्फ गौस अली वारीस अली ऊर्फ मुच्छू अली हा एकेकाळी ‘मौत का कुँवा’मध्ये मोटरसायकल चालवायचा; त्यामुळेच तो मोटरसायकल हाती लागताच सुसाट वेगाने पोलिसांच्या दृष्टिआड होतो. त्यानेही मध्य प्रदेशची लखनादौन ‘जेल ब्रेक’ केली आहे. मुझे रोक सके ऐसी कोई जेल बनी नही, असे तो म्हणतो. सध्या राजा गौस हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात छोटी गोलमध्ये आहे. त्याच्याविरुद्ध मोक्का, खून, दरोडे, जबरी चोऱ्या, पोलिसांवर हल्ले, खुनाचा प्रयत्न, असे ३५ गुन्हे भंडारा, घुमा, लखनादौन, पाचपावली, नंदनवन, जरीपटका, पाचपावली, अजनी, सीताबर्डी, प्रतापनगर, इमामवाडा, सोनेगाव आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २००९ पासून तो गुन्हेगारीत सक्रिय आहे. शोएबखान ऊर्फ शिबू, बिशेनसिंग आणि सत्येंद्र गुप्ता हे त्याचे उजवे हात आहेत. मंगळवारच्या पहाटे ते कारागृहातून पळून गेले. सूत्रांच्या माहितीनुसार राजा गौस हा लखनादौन येथेच ‘मौत का कुँवा’मध्ये मोटरसायकल चालवायचा. तो ताशी १२० कि.मी. वेगाने मोटरसायकल चालवितो. लखनादौनची जेल तोडून पळून जाताना त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. राजा गौसचा उजवा हात मानकापूर येथील शोएबखान ऊर्फ शिबू याने त्याला सक्करदरा येथील चौधरी हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी त्याचे मूळ नाव गुप्त ठेवून खोटे नाव सांगण्यात आले होते. एकूणच हालचाली संशयास्पद वाटल्याने गुप्त माहितीवरून या हॉस्पीटलमध्ये पोलीस तैनात झाले होते. जरीपटका आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याचा कडेकोट बंदोबस्त त्याच्या सभोवताल तैनात करण्यात आला होता. बंदोबस्त दीड महिन्यापर्यंत होता. गौसच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एक दिवस तो हा सुरक्षा घेरा तोडून पहाटे ४-५ वाजताच्या सुमारास हॉस्पीटलच्या पाचव्या मजल्यावरून दोराच्या साह्याने खाली उतरून पळून गेला होता. खुद्द त्याच्या भावानेच पलायनासाठी मदत केली होती. गौस पळून जाण्याच्या सवयीचा असल्याने त्याला कारागृहात अतिसुरक्षेत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता, हे विशेष. (प्रतिनिधी)
राजा गौस अन् ‘मौत का कुँवा’!
By admin | Published: April 02, 2015 2:30 AM