लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शगूनची रक्कम वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून तृतीयपंथीयांचे चार गट आपसांत भिडले. भर रस्त्यावरच त्यांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहून बुकलून काढले. यामुळे बैरामजी टाऊन परिसरात रविवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात १५ तृतीयपंथीयांना अटक केली.
सदर, बैरामजी टाऊन परिसरात राहणाऱ्या एका सधन कुटुंबात बाळ जन्माला आले. त्या आनंदात त्यांनी एका पारिवारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी ११ वाजता तेथे तृतीयपंथीयांचा एक गट पोहोचला. त्यांनी तेथून शगूनची रक्कम घेतली. नंतर दुसरा आणि तिसरा गट पोहोचला. या तीन गटांतील मंडळीला कुटुंबाने १६ हजार रुपये दिले. तेवढ्यात पुन्हा चौथा गट पोहोचला. या गटानेही पैशाची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार देऊन दिलेल्या रकमेतूनच तुम्ही आपसात वाटून घ्या, असे म्हटले. त्यावरून १६ हजारांतील रकमेवर चौथ्या गटाने हिस्सा मागून वाद सुरू केला. तो वाढतच गेला. चारही गटांतील तृतीयपंथीयांनी आपल्या गटातील साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. ते येण्यापूर्वीच त्यांनी एकमेकांना बुकलणे सुरू केले. भर रस्त्यावर तृतीयपंथीयांचा फिल्मीस्टाईल गोंधळ सुरू झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्याची माहिती कळताच सदरचे ठाणेदार विनोद चाैधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना तेथे पाठवून १५ तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.
----
पोलीस ठाण्यातही हाय-हाय
पोलिसांनी या १५ तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात येताच चार गटांतील सुमारे ५० तृतीयपंथी सदर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांनी हाय-हाय करत रात्रीपर्यंत गोंधळ घातला. ठाणेदार चाैधरी यांची चारही गटांच्या प्रमुखांनी भेट घेऊन आपसी समेट झाल्याचे सांगत जामीन देण्याची विनंती केली. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी जामिनावर सुटका केली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील माहोल शांत झाला.
----