नागपूर : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा आरोप करत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे. यावर नागपूर सत्र न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावत २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वत: किंवा वकिलाला हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांना याप्रकरणी नागपूरच्या चकरा माराव्या लागणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा आरोप करत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे.
यावर बुधवारी नागपूर येथील दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तसेच नेत्यांविरोधात सातत्याने आरोप करून मोहीम उघडली आहे. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांविरोधात आरोप करत असतात. बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाविकास आघाडीकडून केलेल्या वसुलीच्या पैशातील ४० टक्के वाटा शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी व २० टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप कुठल्याही पुराव्याशिवाय करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे झालेल्या बदनामीची भरपाई म्हणून एक रुपया द्यावा, असेही याचिकेमध्ये म्हटले आहे. सर्व बाबी लक्षात घेता किरीट सोमय्या यांना न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयामध्ये स्वत: किंवा वकिलाला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.