किशोर गजभियेंच्या काँग्रेस एन्ट्रीने ‘उत्तर’मध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:05 PM2018-02-09T23:05:46+5:302018-02-09T23:07:22+5:30
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे गजभिये यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असतानाही आता गजभिये यांच्या काँग्रेस प्रवेशाने भविष्यात उत्तरच्या तिकिटाचा प्रश्न पक्षासमोर निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यामुळे राऊत समर्थकांची चिंता वाढली आहे.
माजी सनदी अधिकारी व रिपाइं नेते उत्तम खोब्रागडे आणि माजी सनदी अधिकारी व बसपा नेते किशोर गजभिये यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. गजभिये यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी व राज्याचे विक्रीकर उपायुक्त म्हणून काम केले आहे. गजभिये यांचा प्रवेश हा प्रदेश काँग्रेसची ‘राजकीय खेळी’ असल्याचे बोलले जात आहे. किशोर गजभिये यांनी सर्वप्रथम विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे भाजपाचे अनिल सोले विजयी झाले व काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना तिसऱ्याक्रमाकांवर समाधान मानून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत गजभिये हे उत्तर नागपुरात बसपाकडून रिंगणात उतरले. त्यावेळीही गजभिये यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे भाजपाचे डॉ. मिलिंद माने विजयी झाले व काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर घसरले. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. विशेष म्हणजे राऊत व गजभिये यांच्यात ५ हजार १४५ मतांचे अंतर होते.
विधानसभा निवडणुकीनंतर गजभिये यांनी बंड करीत बसपा सोडली व बीआरएसपीमध्ये प्रवेश घेतला होता. कालांतराने ते बीआरएसपीपासूनही दुरावले. आता निवडणुका तोंडावर असताना त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडला आहे. गजभियेंचा राजकीय प्रवास पाहता आता ते काँग्रेसचा ‘हात’ किती काळ पकडून ठेवतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.