लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतंगीच्या हुल्लडबाजीमुळे अनेक जण जखमी होतात. विशेषत: धारधार मांजामुळे दुचाकी चालकांचे गळे व हात, पाय कापण्याची शक्यता अधिक असते. याची दखल घेत बुधवारी सदरचा उडाण पूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प केला जातो. आनंदाची देवाणघेवाण होते. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा उन्माद दरवर्षी शहरात दिसून येतो. या सणाच्या पर्वावर नायलॉनच्या मांजावर बंदी असतानाही लपून-छपून धडाक्यात विक्री झाली. आतापर्यंत नायलॉनच्या मांजामुळे कुणाचे हात तर कुणाचा गळा कापलेल्या दहावर किरकोळ रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. गेल्या वर्षीच्या गंभीर घटनांची दखल घेत पतंगीच्या हुल्लडबाजांच्या विरोधात कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. रस्ता अपघाताकडे विशेष लक्ष देण्याचा सूचनाही वाहतूक विभागाला देण्यात आल्याचे समजते. दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठीच सदरचा उडाण पूल दिवसभर बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी सर्व पोलीस ठाण्यांना नागरिकांच्या सुरक्षतेला घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पतंगबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीच्या छताऐवजी मोकळ्या मैदानावर पतंग उडविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी, उडाण पुलावर पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासही सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ठाण्यात डांबून ठेवण्याचे व सर्व पोलीस ठाण्यांना गस्त लावण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. काही पोलीस ठाण्यांनी विशेष पथक तयार केल्याचेही समजते.