लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षकाने हल्लेखोराला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावरही चाकूहल्ला केला. याच दरम्यान भरती रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्लेखोराला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेने मात्र रुग्णालयात खळबळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार, ‘अॅक्यूड फ्लेसिड पॅरालिसिस’ झालेल्या अलिना खान (६) हिला शुक्रवारी मेयोच्या बालरोग विभागाच्या वॉर्ड क्र. ७ मध्ये भरती करण्यात आले होते. सोमवारी तिची प्रकृती अचानक गंभीर झाली. अलिनाला वॉर्डातच असलेल्या पिडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर युनिटमध्ये (पीआयसीयू) दाखल केले. डॉक्टर मुलीला वाचविण्यासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न करीत होते. याचदरम्यान मुलीची आई व नातेवाईक ‘पीआयसीयू’च्या बाहेर काचेतून हे सर्व पाहत होते. मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसताच तिच्या आईचा संताप अनावर झाला. तिने ‘पीआयसीयू’ ची काच फोडली. फुटलेली काच हातात पकडून ‘पीआयसीयू’मध्ये आली. तिथे ठेवलेल्या एका व्हेंटिलेटरला खाली पाडून, हातातील काच फेकून मुलीला जवळ केले. याच दरम्यान मृत बालिकेचा मामा सलीम एजाज (२९) रा. ताजबाग हा चाकू घेऊन वॉर्डात शिरला. त्यावेळी उपस्थित डॉक्टरवर अचानक चाकू उगारला. यावेळी वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक प्रभूदास राठोडने प्रसंगावधान राखून त्याला पकडले, परंतु हल्लेखोराने त्याच्या डोळ्यावर चाकू मारला. रुग्णाच्या नातेवाईकांच्या आरडा-ओरडमुळे बाहेर तैनात असलेला दुसरा सुरक्षा रक्षक सुधाकर सपाठे धावून आला, परंतु हल्लेखाराने त्याच्या हातावर चाकूने हल्ला करून जखमी केले. वॉर्डात भरती असलेले रुग्णांचे नातेवाईक भयभीत झाले, परंतु त्यांनी एकजूट करीत हल्लेखोराला पकडले व चांगलाच चोप दिला. अर्ध्या तास चालेल्या या घटनेने रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, एमएसएफचे सहसंचालक जगदेव आखले यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला तहसील पोलिसांच्या हवाली केले.
नागपुरात रुग्णाच्या मृत्यूला घेऊन डॉक्टरवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:58 PM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षकाने हल्लेखोराला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावरही चाकूहल्ला केला. याच दरम्यान भरती रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्लेखोराला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेने मात्र रुग्णालयात खळबळ उडाली.
ठळक मुद्देदोन सुरक्षा रक्षक जखमी : रुग्णांच्या नातेवाईकांनी पकडून हल्लेखोराला बदडले