नागपर : आपल्या देशाने ज्ञान आणि विज्ञानही दिले आहे. संशोधनकर्ते व शास्त्रज्ञांनी आयुष्यभर एकाग्रतेने काम केले आहे. हे संशोधक म्हणजे आजचे ऋषी असून, त्यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. ते आता मिळू लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपला देश आता खऱ्या अर्थाने उभा राहत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी येथे केले.
हिंदू रिसर्च फाउंडेशन, विश्व मांगल्य सभा आणि मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सप्त ऋषी पुरस्काराचे आयोजन रविवारी कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टम, आयटी पार्क येथे करण्यात आले होते. त्यावेळी संशोधक व शास्त्रज्ञांना उद्देशून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व मांगल्य सभेचे संस्थापक स्वामी जितेंद्रनाथ महाराज, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना, हिंदू रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख डॉ. टी. एस. भाल, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी देशातील प्रसिद्ध संशोधनकर्ते, शास्त्रज्ञ आणि महाकवींना सात ऋषींच्या नावाने सप्तऋषी पुरस्कार देण्यात आला. शाल, एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
हंसराज अहीर म्हणाले, महर्षी व ऋषी मुनींनी प्राचीन काळी केलेले संशोधन परकीयांनी जाळून टाकले. आज पंतप्रधान गरिबांसाठी योजना राबवितात त्यात कुठे ना कुठे ऋषी मुनींची दखल घेतली जात आहे. जगात भारताचे नावलौकित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, भारत विज्ञानाचा देश आहे. भारताने जगाला विज्ञान दिले आहे. विविध प्रकारचे संशोधन हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींकडून भारतवर्षात झाले आहे. मात्र, ते आज वाचणार कोण ? असा सवाल त्यांनी केला, तर भारतात ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनाचे अध्ययन करणे आज आवश्य असल्याचे मत प्रा. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले. डॉ. टी. एस. भाल यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे यांनी केले.
आधुनिक सप्त ऋषी पुरस्कार प्राप्त
मेट्रो मॅन पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांना विश्वकर्मा पुरस्कार, पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना आचार्य कनाद पुरस्कार, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांना आर्यभट्ट पुरस्कार, पद्मश्री डॉ. गणपती यादव यांना नागार्जुन पुरस्कार, डॉ. अनमोल सोनवणे यांना आचार्य सुश्रृत पुरस्कार आणि महाकवी सुधाकर गायधनी यांना महर्षी वाल्मीक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा : डॉ. भटकर
सुपर काॅम्प्युटरचे मिशन तंत्रज्ञानाने यशस्वी पूर्ण झाले. काॅम्प्युटरच्या क्षेत्रात तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. अभियंता आणि संशोधनकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन डॉ. विजय भटकर यांनी केले.
- मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाची गरज : डॉ. काकोडकर
देशाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानातून विचार व्हावा. एआय (आर्टीफिशल इंटेलिजन्स)च्या बाबतीत शिकण्यासारखे खूप काही आहे. मानवी कल्याणासाठी चांगल्या तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
- टीम वर्कमुळेच देशात मेट्रोचे जाळे : डॉ. श्रीधरन
कोकण रेल्वे, मेट्रो रेल्वे हे यश एकट्या माझे नाही तर संपूर्ण टीमचे आहे. आज याच बळावर देशात मेट्रोचे जाळे तयार होत आहे. याचे समाधान असून, देश व समाजासाठी आपण काम केले असल्याचे मत मेट्रो मॅन डॉ. इ. श्रीधरन यांनी व्यक्त केले, तर राष्ट्रीय शिक्षण धोरणावर डॉ. के. कस्तुरीरंगन यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
रसिकांमुळे कलावंत युगेयुगे लक्षात असतात : महाकवी सुधाकर गायधनी
कवी किंवा कलावंत हा अभिव्यक्त झालेला असतो. त्याच्यासाठी रसिक श्रोत्याने दिलेल्या पावतीमुळेच सगळे कलावंत युगेयुगे लक्षात राहत असल्याचे मत महाकवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले.