ब्रिजेश तिवारी
कोंढाळी (नागपूर) : नागपुरातील दोन व्यावसायिकांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाइल व पाकीट कोंढाळीजवळील नांदोरा शिवारात फेकल्याची कबुली दिली. परंतु, मंगळवारी कोंढाळी पोलिसांनी या परिसरातील गवत कापून मोबाइल व पाकिटांचा शोध घेऊनही त्यांना मोबाइल, पाकीट आढळले नाहीत. दरम्यान, नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अब्दुल मन्नान याला कोंढाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपुरातील व्यावसायिक अंबरीश गोळे व निरालाकुमार सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सहाव्या दिवशीही मृत निरालाकुमार यांचा मृतदेह पोलिसांना सापडला नसल्यामुळे पोलिस हैराण झाले आहेत. मंगळवारी कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघाडे यांनी मृत व्यावसायिकांचे मोबाइल व पाकीट शोधण्यासाठी शोधमोहीम राबविली. आरोपींनी सांगितलेल्या कोंढाळीपासून १२ किलोमीटर अंतरावर बीएस ढाब्यासमोर मोबाइल आणि पाकिटाचा शोध घेण्यासाठी ३० ते ४० जणांनी गवत कापून शोधाशोध केली. परंतु काहीच आढळले नाही.
दरम्यान, आरोपींना बंदूक व काडतुसे पुरविणाऱ्या आरोपी अब्दुल मन्नान याला मंगळवारी कोंढाळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.