नागपूर: कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटला असून लाखो टन राख वाहून गेली आहे. हे राख मिश्रीत पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी नाल्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. नैसर्गिक आपदा लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राख मिश्रीत पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नागपूर शहर व आजूबाजूच्या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी यंत्रणाही प्रभावित होणार आहे.
कोराडी येथील वीज केंद्राची राख खसाळा-मसाळा येथील राख बंधाऱ्यात संग्रहित केली जाते. या तलावाला सुरक्षा म्हणून मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा फुटल्याने राख मिश्रीत पाण्याने खसाळा, मसाळा खैरी, कवठा, सुरादेवी या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. तसेच पिवळी नदी व कन्हान नदीच्या पात्रातही हे राख मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, मसाळाचे सरपंच रवी पारधी, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश कराळे, अभय हरणे, राजकुमार तासकर आदी उपस्थित होते.
जमीन सुपीक होण्यासाठी तीन वर्षे लागतील
राख मिश्रीत पाणी शेतीत गेल्यानंतर ती शेती पूर्ववत सुपीक बनण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षे नुकसान होणार आहे.
तत्काळ पंचनाम्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाल्याची दाट शक्यता आहे. तेही तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तिप्पट भरपाई देण्याची मागणी आमदार बावनकुळे यांनी केली आहे.
-