नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून एका युवतीला पळवून नेल्यानंतर तिची राजस्थानात विक्री केल्याची खळबळजनक घटना दोन वर्षांनंतर उघडकीस आली. कोराडी पोलिसांनी तक्रार मिळताच धावपळ करून या प्रकरणातील दोन महिला आरोपींना अटक केली. सीमा ऊर्फ यास्मिन आरीफ खान (वय २८, रा. बाजार चौक महादुला) आणि लता सुरेश साळवे (वय ४५, रा. सिद्धार्थनगर, महादुला) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. मुलीचे नाव पूजा सूर्यभान ढोबळे (वय १६) आहे. तिचे वडील कंपनीत काम करतात. आई गृहिणी असून, तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या पूजासोबत यास्मिनची ओळख आहे. पूजाला नटूनथटून राहणे आवडत असल्याचे हेरून यास्मिनने तिला दोन वर्षांपूर्वी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. चांगला पगार आणि स्वतंत्र जीवनाचे स्वप्न दाखवून तिला घर सोडण्यास प्रवृत्त केले. अल्पवयीन पूजाला यास्मिनच्या कटाची कल्पनाच नव्हती. तिने होकार दिला. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये यास्मिनने पूजाला तिच्या घरून लता सुरेश साळवे हिच्या घरी नेले. कटानुसार तेथे आधीच लताची मुलगी मीना आणि एक बलाराम नामक इसम होता. या सर्वांनी पूजाला भोपाळला नेले. तेथून एकलेरा आणि नंतर राजस्थानमधील अजनावर गावात नेले. तेथे पूजाला एका व्यक्तीला विकण्यात आले. लाखोंची रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी वेगवेगळे कारण सांगून तेथून पळ काढला. विकत घेणाऱ्याने पूजाला डांबून ठेवून तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. तिला घरच्यांनाही संपर्क करण्याची मुभा नव्हती. (प्रतिनिधी)अखेर भंडाफोड झालादोन वर्षे झाल्यामुळे आपले पाप लपल्याचा गैरसमज आरोपींचा झाला होता. अचानक रविवारी सीमाने तिचा मित्र नितीन शेंडे याला फोन केला. आपली राजस्थानमध्ये सीमाने विक्री केली असून, येथे आपला प्रचंड छळ होत आहे. तू माझ्या वडिलांशी माझी बोलणी करून दे, अशी विनंती तिने नितीनला केली. त्यावरून नितीनने सूर्यभान ढोबळे यांच्यासोबत पूजाची बोलणी करून दिली. त्यांना कोराडी ठाण्यातही आणले. ढोबळे यांनी मुलीला विकण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली. त्यानंतर आरोपीच्या पापाला वाचा फुटली. अनेकींची विक्री कोराडीचे ठाणेदार प्रकाश लोंढे यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक तेजिंद्र मेश्राम यांनी लगेच धावपळ केली. पूजाच्या सीमा नामक मैत्रिणीची माहिती काढण्यात आली. त्यानंतर यास्मिनचे नाव पुढे आले. तिला सोमवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीनुसार लतालाही पकडण्यात आले. या दोघीही दिवसभर बनवाबनवी करीत होत्या. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. लताने ८० हजार तर सीमा ऊर्फ यास्मिनने १५ हजार रुपये घेऊन पूजाला विकल्याची कबुली दिली. अन्य आरोपींची नावेही सांगितली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच पूजाला आणण्यासाठी पोलीस पथक राजस्थानला रवाना होणार आहे. अशाच प्रकारे आरोपींनी अनेक मुलींची विक्री केली असावी, असा संशय असून, या प्रकरणाच्या निमित्ताने एक रॅकेटच उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपनिरीक्षक टी.एम. मेश्राम, सचिन हुलके, किसन दुधबावरे, कृष्णकुमार गुप्ता, जगदीश नारनवरे, आरती चव्हाण यांनी आरोपींच्या अटकेत महत्त्वाची भूमिका वठविली.
कोराडीच्या युवतीला राजस्थानात विकले
By admin | Published: May 17, 2016 2:11 AM