लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे गृहीत धरून महापालिका प्रशासनाने पाच रुग्णालये अत्याधुनिक केली. ४५० खाटांसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन येथे एकूण २७२ खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सज्ज केले. यासाठी डॉक्टरांसह ५०० परिचारिका व प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.१०.५० कोटींचा खर्चपाच रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावर ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय सज्ज केली आहेत.मेयो, मेडिकलचा भार कमी कसा होणार?कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक बघता केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाची रुग्णालये सज्ज करण्यात आली. परंतु डॉक्टर व परिचारिका नसल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी कसा करणार, असा प्रश्न कायम आहे.हॉटेलमध्ये अडीच हजार शुल्कशहरातील आठ हॉटेल कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण राहू शकतील; मात्र यासाठी रुग्णांना दररोज अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.मनपा कर्मचाऱ्यांचीच उपचारासाठी भटकंतीमहापालिकेच्या अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागली. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनाही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.