लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नागपुरातील खासगी व व्यावसायिक कंपन्यांच्या ऑक्सिजन सिलिंडर प्रकल्पातून कोविड हॉस्पिटल्सना दररोज ८,६२२ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा (एक सिलिंडर ८ हजार लिटर) पुरवठा करण्यात येत आहे. तसे पाहता मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच आहे. पण आता प्रकल्पात सिलिंडर रिफिलिंग वाढविण्यात येत आहे. नागपुरात एकूण १० प्रकल्प आणि जवळपास १८ व्यावसायिक कंपन्यांकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.
नागपुरात पूर्वीपासून असलेल्या एकूण दहा प्रकल्पामध्ये एअर सेपरेटेबल ऑक्सिजन प्रकल्प तीन (हवेतून ऑक्सिजन घेणे) आणि लिक्विड कॉम्पेसिंग ऑक्सिजन प्रकल्प सात आहेत. सर्व प्रकल्प क्षमतेने काम करीत आहेत. मध्यंतरी ऑक्सिजनचे लिक्विडिफाईड टँकर पुरेसे मिळत नसल्याने पूर्णक्षमतेने ऑक्सिजन निर्मिती होत नव्हती. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर स्थिती सुधारली आहे.
नागपुरात जवळपास १३० खासगी आणि १२ शासकीय व मनपाचे कोविड हॉस्पिटल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कंपन्यांच्या १८ व्यावसायिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना कोणत्या हॉस्पिटलला किती सिलिंडर पाहिजे आहेत, त्याचा दररोजचा कोटा बांधून दिला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पातून जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या कोविड हॉस्पिटलला सिलिंडर पोहोचवायचे आहेत. याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी त्या प्रकल्पात बसून घेत आहेत. त्यामुळे प्रकल्पातून कुठेही सिलिंडर जाणार नाही, याची नोंद घेण्यात येत आहे.
भरतीया मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक बी.सी. भरतीया म्हणाले, सिलिंडर हे लहान-मोठ्या आकारात असतात. त्यात क्युबिक मीटर ऑक्सिजन भरले जाते. मागणीनुसार पुरवठा केला जातो. जम्बो सिलिंडर ७,५०० ते ८ हजार लिटर ऑक्सिजन क्षमतेचे असतात. या सिलिंडरची किंमत २५० रुपये असून, सिलिंडरची ठेव म्हणून १० हजार रुपये घेतले जातात. नागपुरातील कोविड हॉस्पिटलने प्रति बेडनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे ८,६२२ ऑक्सिजन सिलिंडरची नोंदणी केली आहे. पण त्यापेक्षा जास्त १० हजारापेक्षा जास्त सिलिंडर दररोज लागत आहेत. हॉस्पिटलकडून सिलिंडरची मागणी अचानक वाढल्याने एवढ्या सिलिंडरची निर्मिती दररोज होत नाही. पण शासनाच्या प्रयत्नानंतर लिक्विडिफाईड टँकरची मागणी वाढल्यानंतर निर्मितीही वाढली आहे. त्यानंतरही पुरवठ्याच्या तुलनेत हॉस्पिटलचा पुरवठा जास्त आहे.
नागपुरात कमी ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती प्रकल्प असल्याचे कारण म्हणजे अवाजवी विजेचा दर. लगतच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशात विजेचे दर कमी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिक्विडीफाईड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असल्याचे भरतीया यांनी सांगितले. आता हॉस्पिटलला जास्त सिलिंडरचा पुरवठा करायचा झाल्यास प्रकल्पाकडे रिक्त सिलिंडरचा तुटवडा आहे. नवीन सिलिंडरची किंमत दुपटीवर गेली आहे. पुढे सिलिंडरची मागणी कमी झाल्यानंतर रिक्त सिलिंडर पडून राहतील. त्यामुळे जास्त किमतीत कुणीही सिलिंडर खरेदी करीत नाहीत, असे भरतीया यांनी स्पष्ट केले.