पंतप्रधानांचा अवमान, काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा; कृष्णा खोपडेंची उच्च न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 04:03 PM2022-07-21T16:03:26+5:302022-07-21T16:06:45+5:30
या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व अवमानजनक वक्तव्ये केल्यामुळे काँग्रेसचे नेते नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक, विकास ठाकरे, शेख हुसैन व सुनील देशमुख यांच्याविरुद्ध संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, अशा मागणीसह भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
यासंदर्भात १७ जून व २८ जून २०२२ रोजी पोलीस आयुक्त व हिंगणा पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, त्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. पोलिसांनी कायद्याची पायमल्ली केली. करिता, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, असे खोपडे यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी १४ जून २०२२ रोजी केंद्र सरकारविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयापुढे आंदोलन केले होते. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व अवमानजनक वक्तव्ये केली. त्यांची भाषणे इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत, असे खोपडे यांनी याचिकेत नमूद केले आहे.