नागपूर : आॅटो, ई-रिक्षा, स्कूल व्हॅन, स्कूल बस, इतकेच काय तर मेट्रो आॅपरेटर अन् वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांत उपराजधानीतील असंख्य महिलांनी उडी घेत भरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमतने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित समारंभात या महिलांचा यथोचित गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती महिलांचा रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती, शोषित-पीडित वर्गाला जोडून, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन लोकमत परिवार वाढविणे ही श्रद्धेय बाबूजींची संकल्पना होती, असे सांगितले. संचालन लोकमत सखी मंचच्या सहायक व्यवस्थापक नेहा जोशी यांनी केले. सन्मान सोहळ्याला सत्कारमूर्ती महिलांसोबत त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कर्तृत्ववान महिलांचा झाला गौरव समारंभात मेट्रोच्या ज्युनिअर इंजिनिअर पारुल सारडा, नागकन्या विजय, मेट्रो ट्रेन आॅपरेटर शुभांगी ढोके, वृत्तपत्र विक्रेत्या वृषाली नीरज कडू, विशाखा नारायणे, पेपर स्टॉल चालक लीना भुते, स्कूल व्हॅनचालक भारती अग्रवाल, रेणुका दहिवाले, स्कूल बसचालक नलिनी फुलझेले, आॅटोचालक आशा सोमकुवर, अर्चना बोरकर, प्रतिमा बागडे, नीतू सुरजुसे, कल्याणी सोनुले, ई-रिक्षा चालक अंतकला गोहणे, रोशनी बोकडे, लक्ष्मी गोन्नाडे आणि गेल्या ४६ वर्षांपासून सायकलवर फिरून दूध वितरण करणाऱ्या गौरी प्रपंचे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.