लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शहरात मलेरिया व विषाणूजन्य ताप या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना शहरातील स्वच्छतेचा बाेजवारा उडाला आहे. शहरातील कचऱ्याची उचल करण्याचे काम कंत्राटी पद्धतीने केले जात असले तरी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे ही महत्त्वाची कामे केली जात असलेल्या हयगयीमुळे नागरिकांच्या आराेग्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
संपूर्ण देशात केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कुही नगर पंचायतीने बक्षीस पटकाविले असले तरी याच नगर पंचायत प्रशासनाला संकटाच्या काळात स्वच्छतेचा विसर पडला आहे. शहरातील कचऱ्याची नियमित व याेग्य उचल केली जात नसल्याने कुठेही ढीग पडला असल्याचे दिसून येते. माेकाट गुरे, कुत्री व डुकरांमुळे हा कचरा पसरत जाताे. सडक्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांची पैदासही हाेत आहे. त्यामुळे शहरात मलेरिया, विषाणूजन्य ताप व कीटकजन्य राेगांचा झपाट्याचे प्रसार हाेत आहे.
नगर पंचायत प्रशासनाने शहरातील कचऱ्याची उचल करण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदार व सफाई कर्मचारी यांच्यात पगारवाढीवरून वाद उद्भवला आणि शहराच्या साफसफाईचे काम ठप्प झाले. याच कारणामुळे नगर पंचायतीने कंत्राट रद्द केले व नव्याने निविदा काढल्या. तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली हाेती. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नव्याने कंत्राट देण्यात आले. मात्र, कचऱ्याची उचल याेग्य पद्धतीने हाेत नसल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
कचऱ्यासाेबत शहरातील नाल्यांची साफसफाई केली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. काही भागात भूमिगत नाल्या असल्या तरी त्यांचे चेंबर उघडे असल्याने त्यातून डास बाहेर येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
डेंग्यूच्या रुग्णांची शंभरी
नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण कुही तालुक्यात आहे. तालुक्यात आजवर डेंग्यूचे २५० रुग्ण आढळून आले असून, यात १०० रुग्ण कुही शहरातील आहेत. खासगी डाॅक्टरांकडे उपचार करणाऱ्या रुग्णांच्या नाेंदी नसल्याने ही रुग्णसंख्या यापेक्षा माेठी आहे. याला आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. डेंग्यूचे राेज किमान २० रुग्ण तपासणीला येत असल्याची माहिती शहरातील काही खासगी डाॅक्टरांनी दिली. त्यामुळे शहराच्या साफसफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
...
तांत्रिक कारणामुळे शहरातील स्वच्छता यंत्रणा काेलमडल्यागत झाली हाेती. आता नव्याने कंत्राट दिले आहेत. कंत्राटदाराशी चर्चा करून शहरातील स्वच्छता यंत्रणा पूर्ववत व व्यवस्थित केली जाईल.
- काेमल कराळे, मुख्याधिकारी,
नगर पंचायत, कुही.