नागपूर : मोक्काच्या खतरनाक गुन्हेगाराला गुन्हे शाखेतील घडामोडींची माहिती दिल्याचा ठपका ठेवून पोलीस कर्मचारी कुलदीप पेटकर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. विशेष म्हणजे, लोकमतने १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘टीप डील’चे वृत्त प्रकाशित करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. ही कारवाई त्याचाच परिणाम असून, कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट आणि गुन्हेगारी वृत्तीला जबर हादरा बसला आहे. कुख्यात बुकी अजय राऊतचे ११ डिसेंबरला अपहरण करून कुख्यात गुन्हेगार दिवाकर कोतुलवारने पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी वसूल केली होती. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास केला. पहिल्या टप्प्यात अनेक गुन्हेगारांना तपासासाठी गुन्हे शाखेत बोलविण्यात आले. त्यात दिवाकर कोतुलवारचाही समावेश होता. मात्र, त्याने कसलाही संशय येऊ दिला नाही, त्यामुळे त्याला मोकळे करण्यात आले. दरम्यान, चार आरोपींना अटक केल्यानंतर या अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा सूत्रधार कुख्यात कोतुलवार असल्याचे उघडकीस आले. तोपर्यंत कोतुलवार फरार झाला होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला आणि अधिक सूक्ष्मपणे चौकशी केली. फरार कोतुलवारचे कनेक्शन तपासत असतानाच गुन्हेशाखेचा कर्मचारी कुलदीप पेटकर त्याच्या संपर्कात असल्याचे रंजनकुमार शर्मा यांच्या लक्षात आले.
गुन्हे शाखेचा कुलदीप बडतर्फ
By admin | Published: February 23, 2016 3:29 AM