लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाळाचे वय पाच महिने आणि आईचे १३ वर्षे. मातृत्वाचा पुरेसा अर्थही न उमगलेली ही १३ वर्षीय कुमारीमाता कुशीत आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या येरझरा घालत आहे आणि कोवळ्या वयात तिच्यावर बळजबरी मातृत्व लादणारा नराधम मात्र अजूनही मोकाटच आहे. बुधवारी ही १३ वर्षीय कुमारीमाता आपली व्यथा सांगण्यासाठी बाळासह लोकमत कार्यालयात आली तेव्हा तिला तिच्यावर झालेला अन्यायही धड सांगता येत नव्हता इतकी ती निरागस आहे. काटोल येथील कोमल (बदललेले नाव) आपल्या आईसोबत राहते. ती आठव्या वर्गात शिकते. आई दोन घरची भांडी घासून कसेबसे पोट भरते. कोमलच्या गरिबी आणि असहायतेचा फायदा घेऊन परिसरातील निखिल नावाच्या एका नराधमाने तिच्यासोबत बळजबरी केली आणि ही १३ वर्षाची बालिका गर्भवती झाली. काटोल पोलिसात तिच्या आईने तक्रार केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. परंतु तो जामीन मिळवून बाहेर आला. आईने तिच्या गर्भपातासाठी शासकीय रुग्णालयात प्रयत्न केला. परंतु बाळासह मुलीच्याही जीवाला धोका असल्याचे सांगितल्यामुळे जानेवारी महिन्यात अखेर ती आई झाली. आता या १३ वर्षीय मातेपुढे तिच्या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बाळासाठी कुठून तरी मदत मिळावी म्हणून ती पोलिसांकडे वारंवार विनंती करीत आहे. पोलिसांनी तिला चार लाख रुपये मिळतील, असे सांगितले आहे. त्याच अपेक्षेवर ती सरकारी कार्यालयात वणवण भटकत आहे. घरची परिस्थिती अतिशय गरीब, कुणाचाही आधार नाही. महिला अत्याचाराच्या विरोधात आज अनेक संघटना काम करीत आहेत. परंतु या १३ वर्षीय मातेच्या पाठीशी, तिच्या मदतीसाठी कुठलीही संघटना पुढे आली नाही. गरीब आणि कमजोरावर कितीही अत्याचार झाला तरी, त्यांच्या पाठीशी कुणीच नसते, हेच या पीडितेच्या अवस्थेवरून दिसून येते. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून तिला मनोधैर्य योजनेतून लाभ मिळवून देऊ असे आश्वासन दिले. परंतु सध्यातरी सगळेच आश्वासनावर सुरू असून १३ वर्षीय मातेचा संघर्ष मात्र कायमच आहे.
चिमुकल्याला कुशीत घेऊन लढतेय कुमारीमाता
By admin | Published: May 18, 2017 2:19 AM