लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनचोरीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरेच्या हत्येचे गूढ उलगडले आहे. काही दिवसांअगोदर झालेल्या वादातून पाच आरोपींनी त्याची दगडाने ठेचून हत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पथकाने चार जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरे (२२, आयसी चौक) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते. वाहनचोरीच्या प्रकरणात तो काही दिवसांअगोदरच जामीनावर सुटून बाहेर आला होता. काही दिवसांअगोदर त्याचा अष्टविनायक सोसायटीतील संदीप उर्फ चिंटू कुन्नीलाल बोपचे (२३) व आयुष मेश्राम (२१) यांच्याशी मोठा वाद झाला होता. कुणाल हा कॅटरिंगच्या कामावर काही वेळा जायचा. गुरुवारी सकाळी ११ वाजता कुणाल एमआयडीसीमध्ये नोकरी शोधण्यासाठी गेला होता. पावणेचार वाजता तो भाऊ रितेशच्या दुचाकीवर त्याच्यासोबत मावशीकडे जाण्यासाठी निघाला. मात्र शालिनीताई मेघे इस्पितळाजवळ चहाटपरीवर त्याला संदीप बोपचे, आयुष मेश्राम, आदित्य, लांगी उर्फ क्रिश राजा हातीबेंड (१९, वैभवनगर) व बाबू उर्फ कार्तिक हेमराज सुरसाहूत (१९, आनंदनगर, वानाडोंगरी) हे दिसले. त्याने भावाला समोर निघायला सांगितले व स्वत: उतरून गेला. सायंकाळच्या सुमारास वानाडोंगरी संगम रोडच्या बाजुला असलेल्या वृंदावन ले आऊटच्या पाठीमागील बाजूस त्याचा मृतदेह दिसला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता.
सीसीटीव्ही व इतर माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली . चौकशीदरम्यान कुणालचा संदीप व आयुषशी वाद झाल्याची बाब समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता जुन्या वादातून पाचही जणांनी त्याची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आदित्य वगळता इतर सर्व आरोपींना अटक केली आहे. तर पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.