लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार व त्यावरील उपचाराची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘कुतूहल’ हे आगळेवेगळे प्रदर्शन आहे. याची सुरुवात आज नागपुरातून झाली असली तरी त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही माजी खासदार अजय संचेती यांनी येथे दिली.विज्ञान भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या (व्हीएनआयटी)वतीने तीन दिवसीय ‘कुतूहल’ या नाविन्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाची उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, डॉ. शंकर तत्त्ववादी, डॉ. नुकुल पाराशर, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे शैलेश जोगळेकर, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, प्रा. प्रशांत होले, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.डॉ. देशपांडे म्हणाले, इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रामधील ‘कुतूहल’ या प्रदर्शनात अनुभवाला मिळणार आहे. हे अनोखे प्रदर्शन देशात पहिले असावे, असा दावाही त्यांनी केला. महापौर जिचकार यांनी या प्रदर्शनाला शुभेच्छा देत, या प्रदर्शनातून वैद्यकीय माहितीसोबतच या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याने प्रत्येकाने हे प्रदर्शन आवर्जून पाहण्याचे आवाहन केले. यावेळी जोगळेकर, डॉ. पाराशर, डॉ. तत्त्ववादी, डॉ. दिसावल यांनीही आपले विचार मांडले.प्रास्ताविक व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे यांनी केले. संचालन प्रा. रश्मी उड्डनवाडीकर यांनी तर आभार डॉ. संजय वाके यांनी मानले.९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत अभ्यंकरनगर गेट, व्हीएनआयटीच्या परिसरात आयोजित ‘कुतूहल’ प्रदर्शनात १५० वर स्टॉल्स व २५ विशिष्ट शाखा विभागांचा समावेश आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क खुले आहे. या प्रदर्शनात वैद्यकीय क्षेत्रात कामी येणाऱ्या रक्तदाब तपासण्याच्या यंत्रापासून ते सिटी स्कॅन उपकरणांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या सोबतीला शरीरातील विविध अवयवांची माहिती, त्याची रचना व कार्य, आजारांची माहिती आणि त्यावरील उपचाराच्या माहितीचे स्टॉल्स आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी विविध शाळा व नागरिकांनी गर्दी केली होती.नितीन गडकरी यांनी दिली भेटकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनाला भेट देत प्रदर्शनाचे अवलोकनही केले. त्यांनी शासकीय दंत महाविद्यालय, ईएनटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोहन फाऊंडेशन, ‘एम्स’ आदींच्या स्टॉल्सला भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, विवेका हॉस्पिटलच्या स्टॉल्सने अँजिओप्लास्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेंट’च्या कार्याची माहिती जाणून घेतली.