लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: भूविज्ञान व खनिकर्म समन्वेषाच्या १२ भूवैज्ञानीय संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाइट-सिलीमनाइट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून, नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साइट खनिजांची विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध घेण्यात आला आहे. परमाणू खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व छत्तीसगड सीमा क्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरामध्ये युरेनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित आहे.
राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ६० वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये २०२३-२४ मध्ये संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या योजना, तसेच २०२४-२५ मध्ये प्रस्तावित असलेल्या खनिज सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला, यावेळी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या संचालक अंजली नगरकर, भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभागाचे संचालक नवजित सिंग नैय्यर, एमइसीएलचे प्रदीप कुळकर्णी, माईलचे शुभम अंजनकर, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनिअम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरचे मुख्य वैज्ञानिक प्रवीण गुप्ते, महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे अजय देशपांडे, वेकोलीचे ओम दत्त, महासंचालक टी.आर. के. राव, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे श्रीराम कडू, एस. पी. आवळे, उपसंचालक रोशन मेश्राम उपस्थित होते
गोंदिया- छत्तीसगड क्षेत्रात युरेनियमचे पूर्वेक्षण
- २०२४-२५ या वर्षात खनिज सर्वेक्षण-पूर्वेक्षणाच्या १५ योजना चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.
- मॉईलतर्फे भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांदी व बेलडोंगरी, सतक येथे पूर्वेक्षणाचे काम सुरू आहे. वेकोलीच्या खानींचे सॅटेलाईट सर्वेक्षण करून नकाशावर आरेखन, तसेच खरीप व रब्बी पिकांची नुकसान भरपाई संदर्भात सॅटेलाईट नकाशांचा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.