लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच उद्योग ठप्प पडले आहेत. आजाराची भीती आणि काम नसल्याने परराज्यातील जवळपास ९० टक्के स्थलांतरित मजुरांनी गावाकडे पलायन केले आहे. मजुरांच्या पलायनाने बांधकामसह उद्योग क्षेत्राचीही चिंता वाढविली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काम सुरू केले तरी मजूर नसल्याने सर्वच क्षेत्र पंगू होण्याची भीती असून कामाचा वेग मंदावणे आणि महागाई वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास परराज्याचे एक लाखाच्या वर मजूर आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातून हे मजूर रोजगाराच्या शोधात येतात. कामाचे कौशल्य आणि काम करण्याची क्षमता अधिक असल्याने या मजुरांना उद्योग क्षेत्रात प्राधान्य दिले जाते. केवळ बांधकाम क्षेत्राचा विचार केल्यास २५ हजाराच्यावर मजूर परराज्यातील आहेत. जेसीबी मशीन, काँक्रट मशीन ऑपरेटर, लोहा बांधणारे, सेंटरिंग करणारे हे मजूर असतात. शिवाय कामाची क्षमता अधिक असूनही ते कमी पैशात उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर कामासाठी आणत असतात. लॉकडाऊनमुळे यातले जवळपास सर्व मजूर त्यांच्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केली.क्रेडाईचे अध्यक्ष महेश साधवानी यांच्यानुसार शासनाने उद्योग व बांधकामासाठी परवानगी दिली तरी मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा भासणार आहे. क्रेडाईचे जवळपास २५० सदस्य आहेत व त्यांच्याकडे १०००० च्यावर मजूर होते. आम्ही त्यांना पूर्ण सुविधा पुरवून थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र भीती आणि अनिश्चिततेमुळे बरेच मजूर गावाकडे गेले. आता स्थिती सुधारेपर्यंत चार पाच महिने तरी ते परतण्याची शक्यताही नाही आणि त्यांचा विश्वासही वाढणार नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची भीती साधवानी यांनी व्यक्त केली. मजूर नसल्याने अनेकांचे कामही रखडल्याने त्यांनी सांगितले.उद्योग क्षेत्राचीही हीच अवस्था आहे. उद्योग क्षेत्र या मजुरांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक उद्योगात त्यांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचीही गती मंदावण्याची शक्यता व्हीआयएच्या वरिष्ठ सदस्याने व्यक्त केली. फर्निचरच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात राजस्थानच्या कामगारांचा समावेश राहिला आहे. त्यांच्या पलायनाने किमान चारपाच महिने तरी हा व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. कृषी जगताचीही हीच अवस्था निर्माण झाली आहे.हे मजूर कौशल्यपूर्ण असतात आणि कामाची क्षमताही अधिक असते. असे असताना त्यांची रोजीही कमी असते. त्यामुळे कंत्राटदार त्यांना प्राधान्य देतात. हे मजूर गेल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होईल. कामाची गती तर मंदावेल, शिवाय बांधकामात महागाई वाढेल.महेश साधवानी, अध्यक्ष, क्रेडाईआम्ही लहान कंत्राटदार आहोत. सध्या मनपाच्या नालेसफाईचे काम आपल्याजवळ आहे. आमच्याकडे असलेले जेसीबी ऑपरेटर व इतर मजूर सोडुन गावाकडे गेले. आता स्थानिक कामगार काम करीत आहेत. मात्र इतर ठिकाणचे काम थांबले आहे.
परमानंद सुखदेवे, कंत्राटदार