नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला अखेरची घरघर लागली आहे. यातच खासगी केंद्रांमधून सुरू असलेले सोनोग्राफी, पॅथॉलॉजी आणि एक्स-रेची सोयही बंद झाल्याने हे रुग्णालयच ‘आॅक्सीजन’वर आले आहे. नागपूर जिल्ह्यात सुमारे दोन हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे ५० हजार कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनिज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून १९७० मध्ये नागपुरात कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आले.परंतु येथे गेल्या अनेक वर्षांपासून आकस्मिकरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर उपचारच होत नाहीत. गुंतागुंतीच्या प्रसूतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खासगी रुग्णालयांची रुग्णांना वाट धरावी लागते. कामगारांना आरोग्य सेवा प्रदान करताना त्यांच्या वेतनातून १.७५ टक्के आणि कंपनी मालकांकडून ४.७५ टक्के रक्कम कपात करण्यात येते. हा सर्व निधी कर्मचारी विमा योजनेच्या तिजोरीत जमा होतो. कामगारांच्या पैशांतूनच त्यांना आरोग्यसेवा दिली जाते. असे असतानाही कामागरांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
कामगार रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर
By admin | Published: September 28, 2015 3:06 AM