लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. यापैकीच एक म्हणजे श्रम विषमता होय. प्रत्येक व्यक्ती कळत न कळतपणे ही विषमता जोपासते, पाळते. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण कमी लेखतो. तेथूनच ही विषमता सुरु होते. तेव्हा ज्या देशात श्रमालाच प्रतिष्ठा नसेल तिथे श्रमिकांची काय परिस्थिती असेल? म्हणून श्रमिकांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.देशात तब्बल ९३ टक्के श्रमिक हे असंघटित आहेत. किंवा असंघटित क्षेत्रातील आहेत. केवळ ७ टक्के श्रमिक हे संघटित आहेत. असंघटित असलेले ९३ टक्के श्रमिक हे नवनिर्माणाचे काम करतात. उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रातील कामगार हे नवीन इमारती उभारतात. विणकर धाग्यापासून कापड तयार करतो, शेतकरी बियापासून धान्य निर्माण करतो. कारखान्यात काम करणारे मजूरही नवीन निर्माण करीत असतात. त्यामुळे देशाच्या विकासात यांचे महत्त्वाचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर घरकाम करणारी मोलकरीणीचीही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. कारण घरकाम करणारी मोलकरीण आहे म्हणून नोकरदार आपले काम व्यवस्थितपणे करू शकतात. एक दिवस मोलकरीण आली नाही, तर कामावर जायला उशीर होतो, असा अनुभव आहे. एकूण देश घडवण्यात या ९३ टक्के असंघिटत श्रमिकांचाही मोलाचा वाटा आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमाला कुठलेही स्थान नाही. त्यांच्यासाठी वेज बोर्ड नाही. किमान वेतन आहे परंतु कंत्राटदार पद्धतीत ते वेतनही त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची दैनावस्था झाली आहे.यातच मोलकरीणपासून तर ड्रायव्हरपर्यंत आणि मजुरापासून तर शेतकºयांपर्यंतच्या श्रमिकांकडे समाजाची पाहण्याची दृष्टीही विषमता वाढवणारी आहे. अशा श्रमिकांसोबत साधारणपणे आपली वागणूक तुच्छपणाची असते. न कळतपणे आपण त्यांना कमी लेखत असतो. या श्रमिकांच्या श्रमाकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांनी प्रतिष्ठेने पाहिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार बहाल केले आहे. परंतु आपली त्यांच्याकडे पाहण्याची ही दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्या श्रमाला व त्यांना खºया अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही.
महिलांच्या श्रमाकडे सर्वाधिक दुर्लक्षअसंघटित क्षेत्रातील सर्वच श्रमिक तसे पीडित आहेत. परंतु यातही महिला श्रमिकांवर सर्वाधिक अन्याय होत असतो. त्यांना मजुरी पुरुषांपेक्षा कमी दिली जाते. घरी राहणारी महिला ही दिवसभर राबत असते. परंतु तिच्या कामालाही प्रतिष्ठा नाही. तिच्या कामाला कर्तव्य असल्याचे सांगून तिच्या श्रमाकडेही समाज दुर्लक्ष करतो, ही सुद्धा विषमताच असून समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.-विलास भोंगाडे, कामगार नेते