नागपूर : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील उपचारात प्रभावी असलेले अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’ महागडे असून, मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, काही महिन्यापूर्वी २,६०० रुपयांना मिळणारे ५० ‘एमजी’चे हे इंजेक्शन आता ६,५०० रुपयांना मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
कोरोना झाल्यानंतर स्टेरॉईड खूप प्रमाणात घेतलेले, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेले, कृत्रिम श्वसनयंत्रणेवर बराच काळ असलेले आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक आहे. आजारातून बरे झाल्यानंतर दर आठवड्याला नाकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास वेळेत निदान होऊन उपचाराने बरा होणारा हा आजार आहे. परंतु अलीकडे या आजाराचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात वाढले आहे. मेयोत आतापर्यंत १० रुग्ण आढळून आले असून, यातील ६ रुग्णांवर ईएनटी विभागाने शस्त्रक्रिया केली आहे. एका रुग्णाचा डोळा निकामी झाल्याने तो काढण्याची वेळ आली. मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिसच्या २४ रुग्णांवर येथील ईएनटी विभागाने शस्त्रक्रिया केली. सध्या २५ रुग्ण उपचाराखाली आहेत. एका खासगी रुग्णालयात ६३ रुग्णांमधून ३४ रुग्णांचे डोळे काढल्याची माहिती आहे. रुग्ण वाढत असल्याने या रोगावरील औषधांचा तुटवडा पडल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. यातील एका नातेवाईकाने ‘लोकमत’ला सांगितले, मंगळवारी बरीच औषधांची दुकाने फिरल्यानंतर केवळ ‘अम्फोटेरिसिन’चे एक इंजेक्शन मिळाले. हे ५० एमजीचे इंजेक्शन ६,५०० रुपयांचे आहे. डॉक्टरानुसार असे १५० एमजी इंजेक्शन रुग्णाला द्यायचे आहे. तुटवडा पडल्याने हे इंजेक्शन आणावे कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.