लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात महापालिकेची १३१ उद्याने आहेत. त्यात नासुप्रची ४६ उद्याने मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. आधीच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. काम करायला माळी नाहीत. अशा परिस्थितीत उद्यानाची देखभाल कशी करावी, असा प्रश्न उद्यान विभागाला पडला आहे.अनेक उद्यानात पाणीही नाही. ४५ उद्यानांमध्ये शौचालय नाही. उद्यानांच्या तुलनेत निधी उपलब्ध होत नसल्याने देखभालीकडे विभागाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्मार्ट सिटीत स्मार्ट उद्याने कशी निर्माण होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मनपाच्या मालकीची १३१ व नासुप्रची ४६ उद्याने आहेत. नागपूरकरांना सकाळ व संध्याकाळी येथे शुद्ध हवा, चांगले आरोग्य मिळावे, या उद्देशाने फेरफटका मारण्यासाठी ती तयार केली गेली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उद्यानांकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. मनपाच्या उद्यानांबाबत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. निधीची कमतरता हेही त्यामागील एक कारण आहे. मनपाच्या ३१ उद्यानात पाण्याची सोय नाही. परिणामी, येथे येणाऱ्या नागरिकांना घरूनच पाण्याची बाटली आणावी लागते. शिवाय, ऐनवेळेवर पाण्याची गरज भासल्यास स्वत:च व्यवस्था करावी लागते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याअभावी उद्यानांतील हिरवळीवरही मोठा परिणाम होतो.लोकसंख्येच्या प्रमाणात उद्याने नाहीतनागपूर शहरात १७७ उद्याने असली तरी ३५ लाख लोकसंख्या विचारात घेता ही संख्या पुरेशी नाही. त्यात सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना या उद्यानांचा अपेक्षित लाभ होत नाही. उद्यानात वृक्षारोपण व सौंदर्यीकरण तसेच मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहेअनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीउद्यानाच्या सुरक्षेसाठी आवश्यक तैनात सुरक्षारक्षकांचीही वानवा आहे. १५ ठिकाणी सुरक्षा गार्ड नाहीत. त्यामुळे ही उद्याने रामभरोसे आहेत. उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांनाही असुरक्षित वाटते. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मनुष्यबळाचा अभाव, त्यात नासुप्रच्या ४६ उद्यानांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:02 PM