उमरेड : कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळाला नसल्याने पारशिवनी तालुक्यातील कांद्री येथील कोविड सेंटरमध्ये पाच जणांचा तडफडून मृत्यू झाला. इकडे सुविधांच्या बाबतीत अद्यापही परिपूर्णत: नसलेल्या उमरेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने लगेच सावध होणे गरजेचे आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे एका हॉलमध्ये महिला आणि पुरुष रुग्णांसाठी ३८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या याठिकाणी ३० रुग्ण औषधोपचार घेत आहेत. याठिकाणी केवळ तीन ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा असून, एकावेळेस केवळ तीनच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. अशावेळी अन्य रुग्णांना ऑक्सिजन तातडीने हवे असल्यास गंभीर परिस्थिती ओढवत असते. त्यातच नवीन रुग्ण आले तर त्यांना ऑक्सिजनअभावी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाही. दुसरीकडे ग्रामीण भागातील गोरगरीब-सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, अशी खासगी दवाखान्यात सुविधा उपलब्ध नाही. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचे बेहाल होत आहेत. दिवसागणिक परिस्थिती हाताबाहेर जात असून, कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास भयानक परिस्थिती उद्भवण्याची संभावना व्यक्त होत आहे.
सिलिंडरचे व्हॉल्व्ह निकामी
ऑक्सिजनबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने माहिती काढली असता, ऑक्सिजन सिलिंडरचे व्हॉल्व्ह निकामी झाल्याची बाब समोर आली. सिलिंडरचे व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर टाकली असून, मागणी केलीे; मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही, अशी माहिती मिळाली. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णांची संख्या आणखी अधिक वाढण्यापूर्वीच योग्य व उत्तम व्यवस्था कशी असावी, याकडे जाणिवेने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय वाघमारे, प्रमोद घरडे, दिलीप राऊत, अश्विन उके, नागसेन निकोसे, रामेश्वर सोनटक्के आदींनी केली आहे.