लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : दाेन वर्षांपूर्वी कळमेश्वर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला हाेता; मात्र प्रशासनाने भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काेणत्याही प्रभावी उपाययाेजना केल्या नाहीत. तालुक्यात पाण्याचा उपसा सुरूच असून, तुलनेत जलसंवर्धनाकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही. पाण्याचा वापर आणि जलसंवर्धन यात कमालीचा असमताेल असल्याने भविष्यात पाणी समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जलस्रोतांचा विचार करता, तालुक्यात लघुपाटबंधारे विभागाचे चार तलाव आहेत. यात मोरधाम प्रकल्प, चंद्रभागा प्रकल्प, कोतवालबर्डी प्रकल्प, मधुगंगा प्रकल्पाचा समावेश आहे. साेबतच तालुक्यात २१५ सार्वजनिक विहिरी आणि १३ तलावदेखील आहेत. यात सोनपूर (आदासा), वाढोणा (खुर्द), वरोडा येथील मालगुजारी तलाव उबगी व पिल्कापार शिवारातील पाझर तलाव तसेच तेलकामठी, तिष्टी, पिल्कापार, कारली, खापरी (वनेरा), रामगिरी, गोंडखैरी शिवारातील लघुसिंचन विभागाच्या तलावांचा समावेश आहे.
सध्या यातील बहुतांश तलाव काेरडे पडले आहेत. प्रशासन त्यातील गाळ काढून शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करून परवानगी देण्यास तयार नाही. तालुक्यातील पाणी समस्या वर्षानुवर्षे बिकट हाेत चालली असताना याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. गाळामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून, त्यातील पाणी जमिनीत झिरपत नसल्याने भूगर्भातील जलस्तरदेखील वाढत नाही. त्यामुळे समाधानकारक पाऊस हाेऊनही तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामाेरे जावे लागत आहे.
...
तलावांमधील उपलब्ध जलसाठा
तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या मोरधाम जलाशयात सध्या ४२.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मधुगंगा जलाशयात ६३.८६ टक्के, कोतवालबर्डी जलाशयात ४०.३० टक्के, चंद्रभागा जलाशयात ४४.५३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने त्यांची पाणीसाठवण क्षमताही दिवसेंदिवस कमी हाेत चालली आहे.
...
मालगुजारी तलावांचे क्षेत्रफळ
सोनपूर (आदासा) येथील मालगुजारी तलावाचा आकार १.२५ हेक्टर आर असून, उबगी शिवारातील पाझर तलाव ९.०६ हेक्टर आरमध्ये विस्तारला आहे. वाढोणा (खुर्द) शिवारातील मालगुजारी तलावाचे क्षेत्रफळ १.५० हेक्टर आर तर तेलकामठी शिवारातील लघुसिंचन विभागाचा तलाव ८.७६ हेक्टर आर जागेवर तयार केला आहे. तिष्टी (१) हा लघुसिंचन विभागाचा तलाव १०.०३ हेक्टर आर तर तिष्टी(२) लघुसिंचन विभागाचा तलाव १२.४३ हेक्टर आर, पिल्कापार लघुसिंचन तलाव १३.६३ हेक्टर आर, वरोडा येथील मालगुजारी तलाव २.१० हेक्टर आर, कारली लघुसिंचन तलाव १२.७० हेक्टर आर, खापरी (वनेरा) लघुसिंचन तलाव ८.९० हेक्टर आर, पिल्कापार पाझर तलाव ६.० हेक्टर आर, रामगिरी लघुसिंचन तलाव २०.०० हेक्टर आर, गोंडखैरी लघुसिंचन तलाव २.४० हेक्टर आर जागेवर विस्तारला आहे.
....
लोहगड परिसरातील पाण्याची पातळी खूप खाेलवर आहे. या भागात ८०० फूट खाेलवर काळा दगड आहे. त्यामुळे या भागातील पाझर तलावाच्या भरवशावरच या परिसरातील पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे. सध्या हा तलाव कोरडा पडला आहे. पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी त्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.
- नरेंद्र डहाट, सरपंच.
गटग्रामपंचायत, लोहगड (झिल्पी).