लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा वर्षांपूर्वी नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनला मंजुरी मिळाली. त्यानंतर चौथी लाईनही मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही थर्डलाईन, चौथी लाईन पूर्ण करण्यात आली नाही. नागपूर-सेवाग्राम मार्गाची क्षमता १०० रेल्वेगाड्या धावण्याची आहे. परंतु पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या सुरू असल्यास या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होते. त्यासाठी लवकर थर्ड आणि फोर्थ लाईनचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
नागपूर-सेवाग्राम या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अधिक आहे. या मार्गाची क्षमता दिवसाकाठी १०० रेल्वेगाड्या चालविण्याची आहे. परंतु नियमित रेल्वेगाड्या सुरू असताना या मार्गावर १५० रेल्वेगाड्या धावतात. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. सतत रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी वेळ मिळत नाही. या मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या पाहून रेल्वे मंत्रालयाने दहा वर्षांपूर्वी थर्ड लाईनची घोषणा केली. त्यानंतर फोर्थ लाईनचीही घोषणा करण्यात आली. थर्ड आणि फोर्थ लाईनचे कामही सुरू करण्यात आले. परंतु हे काम कासवगतीने सुरू आहे. कोरोनानंतर नियमित रेल्वेगाड्या सुरू झाल्यास या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी वेळ मिळणार नाही. लॉकडाऊनमध्ये रेल्वे प्रशासनाकडे थर्ड आणि फोर्थ लाईनचे काम करण्यासाठी बराच वेळ होता. तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने हे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी थर्ड लाईन आणि फोर्थ लाईनचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने थर्ड, फोर्थ लाईन आवश्यक
नागपूर-सेवाग्राम मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अधिक आहे. त्यासाठीच रेल्वेने थर्ड, फोर्थ लाईनची घोषणा केली. या मार्गावर पूर्ण रेल्वेगाड्या सुरू झाल्यास रेल्वे रुळावर भार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने थर्ड, फोर्थ लाईनचे काम करणे गरजेचे आहे.`
प्रवीण डबली, माजी झेडआरयूसीसी सदस्य, दपूम रेल्वे
प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प
`थर्ड, फोर्थ लाईन हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. नागपूर-सेवाग्राम मार्गावर रेल्वेगाड्या क्षमतेपेक्षा अधिक धावतात. त्यामुळे या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन गरजेची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने लवकर हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे.`
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र