लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका जीम ट्रेनरवर दीड महिन्यापर्यंत अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी युवकासह त्याच्या घरातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सूरज मेश्राम, त्याचे वडील हरीदास मेश्राम, आई विमल मेश्राम आणि बहीण ममता अशी आरोपींची नावे आहे. तक्रारकर्ती पीडित २२ वर्षीय तरुणी ही मूळची चंद्रपूरची रहिवासी आहे. ती जीम ट्रेनर आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ती ४ एप्रिल रोजी सूरजच्या संपर्कात आली. सूरजने तिला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात फसविले. यानंतर दोघांमध्ये ‘चॅटिंग’ होऊ लागले. तरुणीच्या म्हणण्यानुसार सूरजच्या बहिणीने तिला फोन करून भेटण्यासाठी नागपूरला बोलावले. सूरज हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत राहतो. ४ जून रोजी तरुणी सूरजच्या घरी पोहोचली. सूरज व तिच्या घरच्यांनी काही दिवस घरीच थांबण्यास सांगितले. तेव्हापासून तिचे शोषण होऊ लागले. तिला बंधक बनवून ठेवण्यात आले. तिच्या एटीएममधून १५ हजार रुपयेही काढून घेतले. तिने अनेकदा घरी जाण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी तिला अडवायचे. तिला खोलीबाहेरही जाऊ दिले जात नव्हते. २२ जुलै रोजी तरुणीने फोन करून आपल्या घरच्यांना सूचना दिली. तरुणीच्या घरच्यांनी नागपुरात येऊन तिला सोडविले. तरुणीने चंद्रपूरला गेल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा चंद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि बंधक बनवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ नागपूर असल्याने प्रकरणाचा तपास हुडकेश्वर पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आला.बुधवारी रात्री दस्तावेज पोहोचल्यावर हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलीस आरोपींच्या घरी गेले परंतु त्यांचा कुठलाही पत्ता लागला नाही. या घटनेने पोलिसांसमोरही अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. तरुणीला दीड महिन्यापर्यंत बंधक बनवण्याचे कुठलेही कारण दिसून येत नाही. तसेच या दरम्यान तरुणीने स्वत:च्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न का केले नाही हाही प्रश्नच आहे. तसेच दीड महिन्यापर्यंत तरुणीचे कुटुंबीय गप्प का होते, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.