लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) या वकील महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला तिचा वकील पती आणि सासू तसेच नणंद जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनालीच्या माहेरच्या मंडळींनी बुधवारी रात्री दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.मुंबईचे माहेर असलेल्या सोनाली हुडकेश्वरमधील आनंदविहार कॉलनीमध्ये राहत होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचे अमरदीप रंगारी सोबत लग्न झाले होते. दोघेही विकली करीत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना जुळी मुले (मुलगा, मुलगी) झाली. त्यानंतर सोनाली यांनी न्यायालयात जाणे बंद केले. दरम्यान, घरगुती कारणामुळे पती अमरदीप रंगारी यांच्यासोबत सोनालीचे वारंवार खटके उडायचे.रंगारी कुटुंबीयांनी आनंद विहार कॉलनीत घेतलेल्या सदनिकेचे २८ सप्टेंबरलाच वास्तुपूजन केले होते. त्यामुळे त्यांचे अनेक नातेवाईक कार्यक्रमाला आले होते. त्यातील काही मुक्कामीही होते. नातेवाईकांसमोरच पती-पत्नीमधील मतभेद उघड झाले होते. काहींनी दोघांनाही समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही.सोमवारी ३० सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सोनाली आणि त्यांचे पती अमरदीप यांच्यात सदनिकेच्या गॅलरीत वाद सुरू होता. ते मोठमोठ्याने बोलत असतानाच सोनाली यांनी तिसºया माळ्यावरून उडी मारली. जोरदार किंकाळी ऐकू आल्याने नातेवाईक तसेच शेजारी धावले. त्यांनी सोनालींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.मंगळवारी सोनाली यांच्या माहेरची मंडळी नागपुरात पोहचल्यानंतर त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमीवर, बुधवारी रात्री बेबीनंदा नामदेवराव पाटील (वय ५२, रा. कोहिनूर पॅराडाईज, कामोटे, नवी मुंबई) यांनी हुडकेश्वर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सोनालीचे पती, सासू, सासरे आणि नणदेवर गंभीर आरोप लावले. हे तिघे सोनालीला माहेरून पैसे आणावे म्हणून छळत होते, त्याला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून हुडकेश्वर पोलिसांनी सोनालीचे पती अमरदीप भालचंद्र रंगारी (वय ३२), भालचंद्र रंगारी, सासू सतवा भालचंद्र रंगारी आणि अकोल्यात राहणाºया सक्कू नामक नणदेविरुद्ध कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांची सतर्कता !उच्चशिक्षित अन् कायद्याचे ज्ञान असणाऱ्या विवाहितेने लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांनंतर आत्महत्या केल्याच्या वृत्ताने नागपुरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, मृत सोनाली वकील होती आणि मुख्य आरोपी तिचे पती अमरदीप हे देखील वकील असल्याने पोलीस हे प्रकरण सतर्कपणे हाताळत आहेत. त्याचमुळे गुन्हा दाखल झाला तरी गुरुवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नव्हती. तपास सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.
महिला वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:14 PM