प्रवीण खापरे /
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात तीन तरुण मुलींचा सांभाळ, बाहेर कोरोनाची दहशत आणि खांद्यावर सामाजिक जबाबदारीचे ओझे... अशा त्रिवेणी कर्तव्याची मदार संगीता मारुती चंदनखेडे सांभाळत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या शिपाई संगीता आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत संचारबंदीचे यथोचित पालन करण्यास नागरिकांना बजावत आहेत. मी स्त्री आहे, मी माता आहे आणि इतरांसाठी प्रेरणाही आहे, अशी ही कर्तव्यदक्ष माऊली भर उन्हात उभी राहून इतरांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत आहे.संगीता यांचे पती मारुती हेही पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. मिथिला, अश्विनी आणि अंजली या तीन मुलींनी त्यांच्या घरात आनंदाचा झरा वाहत होता. सगळे व्यवस्थित चालले असताना अचानक मारुती यांना कावीळची बाधा झाली आणि त्यातच ते २००७ मध्ये दगावले. अशा स्थितीत संगीता आणि त्यांच्या तीन मुली एकट्या पडल्या. कधी बाहेर निघणे नाही की बाहेरच्या जगाशी तसा व्यावहारिक संबंध नाही. त्यामुळे गाडी चालविणे तर दूरचेच. त्यावेळी मिथिला ११, अश्विनी ९ आणि अंजली सात वर्षाच्या होत्या. या चिमुकल्यांचेओझे खांद्यावर घेऊन कुटुंब चालविणे संगीता यांना अत्यंत अवघड होते. त्यातच अथक प्रयत्नानंतर पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वानुसार २०१० ला संगीता पोलीस खात्यात रुजू झाल्या. अत्यंत सामान्य घरातील महिला सातत्याने गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या खात्यात रुजू होताच, तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल कशी होत असेल, हे त्यांनाच ठाऊक़ तीच स्थिती संगीता यांची होती. नोेकरी सांभाळत मुलींचे शिक्षण पूर्ण झाले. तिन्ही मुली आज तरुण आहेत आणि शिक्षणाचे पुढचे टप्पे गाठत आहेत. कोरोनाचा भस्मासुर साºया जगाला वेटोळे घालून बसला आहे आणि अशात घराच्या बाहेर पडणे म्हणून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी भीती जनसामान्यांमध्ये आहे. अशा भयकारी वातावरणातही पोलिसी कर्तव्याचे वहन इतर सहकाºयांसोबत संगीता करत आहेत. नागरिकांना सुरक्षित राहा आणि त्यासाठी घरी राहा म्हणत संगीता मुलींना सोडून नैतिक जबाबदारी पार पाडत आहेत. संगीता यांच्यासारख्या अनेक महिला पोलीस अशाच प्रकारे आपल्या कर्तव्याचे निर्वहन करत आहेत. संगीता यांच्याकडे बघून इतर महिला पोलीस कर्तव्यावर दिसतात, त्यांच्या मागे असलेल्या अनेक जबाबदारीचे ओझे सहज लक्षात येते.बंदोबस्ताच्या काळात १६ तास ड्यूटी!पोलिसांची ड्यूटी तशी दरदिवसाला १२ तासांची असते. मात्र, बंदोबस्ताच्या काळात १६ तासांच्या वर ड्यूटीचा वेळ असतो. काही काळ एका ठिकाणी कर्तव्य बजावणे व काही काळ संचार करत नागरिकांना सजग करणे, अशी ही व्यवस्था आहे. सर्वसामान्यांना पोलीस म्हणजे उगीच चौकशा, असे वाटते. मात्र, त्यांच्या चौकशांच्या मागे असलेली कर्तव्यभावना उदात्त असते, याचे भानही नागरिकांनी जपणे गरजेचे आहे.मुली समजदार झाल्यात: घरात तीन गोंडस मुली असताना एक महिला म्हणून बाहेर लक्ष लागणे कठीणच. कर्तव्यावर असताना मुलींचे चेहरे सतत नजरेपुढे असतात. मुलीही सतत फोन करून विचारपूस करत असतात. आता त्यांना सवय झाली आणि माझ्या कर्तव्याची जाणीवही. माझ्या मुली समजदार झाल्यात, अशी भावना संगीता चंदनखेडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.