वानाडोंगरी : पर्यटकांना भुरळ घालणारा हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलाव सर्वांना परिचित आहे. मात्र गेल्या काही वर्षांत येथे १०० हून अधिक नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. यासोबतच तलावात कुठे गाळ आहे, याची कल्पना नसल्याने आतापर्यंत येथे अनेकांचा जीव गेला आहे. यासंदर्भात लोकमतने १९ मे रोजी ‘मोहगाव झिल्पी तलाव ठरतोय पर्यटकांसाठी धोकादायक’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करीत येथे संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत मोहगाव झिल्पी ग्रामपंचायत प्रशासनाने तलाव परिसरात विविध ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. यात हा तलाव पोहण्यासाठी धोकादायक असून कुणीही पाण्यात उतरू नये, असे स्पष्ट केले आहे. पर्यटकांनी येथील निसर्गाचा आनंद घ्यावा, मात्र जीव धोक्यात टाकू नये, असेही ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वन समितीला हस्तांतरण कधी होणार?
गावातील वन समितीकडे हे पर्यटनस्थळ हस्तांतरित करावे. येथे दोन सुरक्षा रक्षक नेमले जातील. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. याबाबत वन विभागाला वारंवार विनंती केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हे पर्यटनस्थळ हस्तांतरित केले नसल्याचे वन विभागामार्फत सांगितले जाते.
- प्रमोद डाखळे, सरपंच, मोहगाव झिल्पी.