नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमत नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी, २ एप्रिल रोजी ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ या विषयावर रामदासपेठेतील हाॅटेल सेंटर पाॅइंटमध्ये दुपारी २.३० वाजता ‘लाेकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह’ आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. लाेकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहतील.
एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, लाेकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, न्यूज १८चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८ लाेकमतचे संपादक आशुताेष पाटील, पंजाब केसरी व नवाेदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकू श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनाेद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता काैशिक या परिषदेत मते मांडणार आहेत. परिषदेतील पहिल्या सत्राचे संवादक लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव, तर दुसऱ्या सत्राचे संवादक लोकमत समाचार, नवी दिल्लीचे सहयोगी संपादक संजय शर्मा असतील.
विदर्भातील तीनशेहून अधिक पत्रकार येणार
लोकमत समूहाने खास पत्रकारांसाठी आयोजित केलेली ही पहिलीच राष्ट्रीय परिषद असून, या परिषदेच्या निमित्ताने विदर्भातील पत्रकारांना एका महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेला विदर्भाच्या सर्व अकरा जिल्ह्यांमधून तीनशेहून अधिक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.