लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घटस्फोटित आणि विधवा तसेच एकाकी श्रीमंत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तसेच त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या आकाश माणिकलाल अग्रवाल (वय ४०) नामक लखोबा लोखंडेला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने विविध राज्यातील अनेक महिलांशी लग्न करून त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.आरोपी अग्रवाल विविध नावाने वेगवेगळ्या ठिकाणी वावरतो. सध्या तो बेसा मनीषनगरातील स्वस्तिक अपार्टमेंटमध्ये राहतो. शादी डॉट कॉम आणि सेकंड शादी डॉट कामच्या माध्यमातून तो एकाकी, विधवा, घटस्फोटित आणि निराधार श्रीमंत महिलांना आपल्या जाळ्यात ओढतो. आपला पेट्रोलपंप आहे, मोठे रेस्टॉरेंट आणि फार मोठा व्यवसाय आहे, अशी थाप मारून आपण एकटेच आहोत. आपल्याला कुणीतरी जिव्हाळ्याचा साथीदार हवा आहे, अशी थाप मारून तो संबंधित महिलेला आकर्षित करतो. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतो. तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि नंतर तिच्या नावे असलेली चलअचल संपत्ती विकून तिला वाऱ्यावर सोडतो. त्याने महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील अनेक महिलांशी अशा प्रकारे दगाबाजी करून त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा केला आहे. २३ आॅगस्टला दुपारी ३.३० ला त्याने अशाच प्र्रकारे बेसाबेलतरोडीत एका महिलेला भेटीला बोलवले. तिला घर आणि व्यवसाय दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या डस्टर कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. महिलेला त्याची विकृती लक्षात येताच तिने त्याची कानउघाडणी केली. त्याला ती झापतच कारमधून उतरली. तेवढ्यातच एक महिला कारजवळ आली. हा व्यक्ती दगाबाज असून त्याने आपल्यासोबत तसेच अनेक महिलांशी अशाच प्रकारे दगाबाजी केल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यामुळे या महिलेने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे प्रकरण पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या कानावर जाताच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून घेतली.मद्यतस्करीतही सहभागआरोपी अग्रवालच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले. त्याने केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि इतर प्रांतातील महिलांसोबतही लग्न करून त्यांचे शारीरिक शोषण केले आणि त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यासोबत गडचिरोलीत अवैध दारू तस्करी आणि विक्रीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे कळताच दोन दिवसात पाच महिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या. या आरोपीने त्यांची ४० लाखांनी फसवणूक केल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक करतानाच त्याची डस्टर कारही जप्त केली.जबलपुरात दोन प्रकरणेलग्नाच्या काही दिवसानंतरच तो आपल्या व्यवसायात तोटा आल्याचे सांगून संबंधित महिलेची स्थावर मालमत्ता तसेच दागिने विकण्यास तिला बाध्य करतो आणि ही रोकड घेऊन तो संबंधित महिलेला वाऱ्यावर सोडून पळून जातो. आकाशने जबलपूरमधील दोन महिलांशी अशाच प्रकारे लग्नाचा बनाव केला. त्यातील एक विधवा होती. तिचा भूखंड, दागिने आणि रोख असा २० लाखांचा ऐवज घेऊन आरोपी पळून गेला. जबलपुरातीलच दुसऱ्या एका महिलेला त्याने २५ लाखांचा गंडा घातला आहे. आणखी अनेक प्रकरणे त्याची पुढे येण्याचे संकेत आहे. त्यानुषंगाने पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त राजेंद्र धामनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे, पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे, पीएसआय कैलास मगर, संदीप आगरकर, कविता कोंकणे, नायक रितेश ढेगे, अमोल दोंदलकर, प्रशांत सोनुलकर आदींनी ही कामगिरी बजावली.