भिवापूर : चंद्रपूर जिल्हा दारुबंदीचा पुकारा होताच सीमावर्ती भागातून दारूचा पूर वाहू लागला. यादरम्यान स्थानिक पोलिसांनी दिवसरात्र कारवाई करत लाखो रुपयांची दारू जप्त केली. हा जप्त दारूसाठा मोठा असल्यामुळे तो नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने विनंती केली होती. दरम्यान, न्यायालयाचे आदेश मिळताच जप्तीतील दारुसाठ्यावर गुरुवारी बुलडोझर फिरविला. बाटल्यांचा चुराडा करत त्या जमिनीत पुरल्यात. २०१५ ते २०२० दरम्यान भिवापूर पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात तब्बल २७५ कारवाया केल्या. यात शेकडो आरोपींना अटक करत त्यांच्याकडून दारूसह वाहन व इतर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात निव्वळ जप्त दारूची किंमत १८ लाख रुपयांवर आहे. त्यामुळे कारवाईतील दारू व साहित्य ठेवण्याकरिता पोलीस स्टेशनची जागा अपुरी पडत होती. पाच वर्षांपासूनचा हा दारूसाठा असल्यामुळे दारूच्या पेट्यांना कुठे उधळी लागली, तर कुठे बाटल्या फुटल्यात. प्लास्टिकच्या बाटल्यांची उंदरांनी नासधूस केली. त्यामुळे हा जप्तीचा दारूसाठा नष्ट करण्याकरिता ठाणेदार महेश भोरटेकर यांनी भिवापूर न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. दरम्यान, भिवापूर न्यायालयाने १९ जानेवारी रोजी तर जिल्हाधिका-यांनी ४ मार्च रोजी सदर दारूसाठा नष्ट करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये स्टॉकबंद असलेला हा दारूसाठा गुरुवारी दुपारच्या सुमारास नष्ट करण्यात आला. हा संपूर्ण दारूचा साठा स्थानिक आंभोरा रोड परिसरातील खुल्या जागेत वाहनाने नेण्यात आला. येथे दारू भरलेल्या असंख्य बाटल्या प्रारंभी रिचविण्यात आल्या. त्यावर रोडरोलर फिरवून बाटल्यांचा चुराडा करण्यात आला. काच व प्लास्टिकच्या तुकड्यांमुळे पर्यावरणासह जनावरांना त्रास होऊ नये, यासाठी हा संपूर्ण चुराडा नंतर जेसीबीने केलेल्या खड्ड्यात पुरण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे, उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक प्रवीण मोहतकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
चार बोलेरो दारूसाठा
पोलीस स्टेशनमधील हा दारूसाठा चार बोलेरो वाहनांनी नेण्यात आला. पोलिसांच्या सहभागात हा दारूसाठा जात असल्यामुळे नागरिकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते.