नागपूर : दिवाळीचा लखलखाट आतापासून पसरायला लागला आहे. घरांची स्वच्छताही जोमात सुरू आहे. केरकचरा बाहेर काढला जात असून यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी केरसुणी मात्र काही प्रमाणात महागली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनात केरसुणीचा मान आहे. यंदा केरसुण्या १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत. वाढत्या महागाईच्या दिवसात यातही दरवाढ दिसत आहे. दिवाळीच्या तयारीआधी घरोघरी खरेदी होते ती झाडूची ! अर्थात स्वच्छतेच्या कामात मोलाची भूमिका बजावणारी ही वस्तू गरजेची आहे.
दिवाळीत केरसुणीच्या पूजेची प्रथा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. अधर्म, आळस, लोभ, वासना, अत्याचार, कुप्रवृत्ती अशा ठिकाणी अलक्ष्मीचे वास्तव्य असते. तिला दुर्भाग्य, अशुभ, अपयशाची देवता मानले जाते. तिचे वाहन गाढव असून, हातात झाडू हे आयुध होते. यामुळेच ती घरात येऊ नये म्हणून या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे.
आकारानुसार केरसुणीचे दर
नागपुरात केरसुणीचे दर आकारमानानुसार आहेत. ६० ते ८० रुपयात एक केरसुणी पडते. झाडू ४० रुपयात, तर लहान केरसुणी ३० ते २५ रुपयांत विक्रीसाठी आहे. झाडूची जोडी घेतल्यास १०० ते ११० रुपयांत मिळते.
पूजेचे साहित्यही महाग
काही प्रमाणात पूजेचे साहित्यही महागले आहे. बत्ताशे, प्रसाद, लक्ष्मीची मूर्ती आदी साहित्यातही जवळपास ५ ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे.
केरसुणी बनविण्यासाठी पानोऱ्यांचा कच्चा माल छिंदवाडामधून येतो. त्याची किंमत महागली आहे. वाहतूक दरही वाढले आहे. केरसुणी बांधणाऱ्या कारागिरांचीही आता कमतरता असल्याने परिश्रम वाढले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात किंमत वाढवावी लागली आहे.
- परसराम सोळंकी, कारागीर आणि विक्रेता