नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत नागपूर विभागातून नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील बाबुळवाडा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला. पारशिवनी सारख्या आदिवासी बहुल भागात असलेल्या या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली. या अभियानात केंद्र स्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातून ३५०० वर शाळांनी सहभाग घेतला होता.
जिल्हास्तरावर निवड झाल्यानंतर विभागस्तरावरील स्पर्धेत शाळेने दुसरा क्रमांक पटकाविला. मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते शाळेचे सचिव पंकज बावनकुळे व शाळेच्या प्राचार्य राजश्री उखरे यांचा रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.