नागपूर : मोबाईल चार्जरसह वेगवेगळ्या सुविधा आणि वैशिष्ट्यांनी नटलेली लालपरी राज्यातील वेगवेगळ्या विभागात दाखल होत आहे. नागपूर विभागातही दोन नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या असून आणखी १८ लालपरी नागपूर कडे येण्यासाठी सज्ज होत आहेत.
महिला प्रवाशांना तिकिट भाड्यात मिळालेली ५० टक्के सूट, शाळा-महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या आणि लग्नसराईचा धूमधडाका यामुळे सध्या राज्य परिवहन महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या बसेसलासुगीचे दिवस आले आहेत. विविध बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून जवळपास प्रत्येकच एसटी बस प्रवाशांनी भरभरून वाहत असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणांवर प्रवासी वाढले असले तरी एसटीच्या बसगाड्या मर्यादित आहेत. त्यातील काही जुन्या बसगाड्या ठिकठिकाणी बंद पडतात. हे सर्व लक्षात घेऊन एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक विभागाला नव्या कोऱ्या बसगाड्या देण्याच्या उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार अनेक बसगाड्यांची खरेदीही झाल्याचे समजते. या नव्या एसटी बसेस थोड्या थोड्या संख्येत राज्यातील प्रत्येक विभागाला पाठविल्या जात आहे. नागपूर विभागालाही गेल्या चार दिवसांत दोन नव्या कोऱ्या एसटी बसेस मिळाल्या आहेत. आणखी १८ बसेस लवकरच नागपूर विभागात दाखल होणार असल्याचे एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी सांगितले आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
नागपूर विभागात दाखल झालेल्या नव्या एसटी बसेसचे मॉडेल बीएस-६ आहे. बसमध्ये प्रवाशांसाठी 'दोन बाय दोन'ची चांगली आणि आरामदायक आसन व्यवस्था आहे. मोबाईल चार्जिग करण्याची, पाण्याची बाटली तसेच अन्य साहित्य (सामान) ठेवण्याचीही व्यवस्था आहे. आधीच्या तुलनेत या बस धूर कमी सोडतात, अर्थात प्रदुषणही कमी करतात.
ड्रायव्हरची आसन व्यवस्थानवीन लालपरीत चालकाच्या (ड्रायव्हर) आसन व्यवस्थेकडे खास लक्ष पुरविण्यात आले आहे. चालकाचे आसन मागे-पुढे आणि खाली वरही होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे चालक त्याचे आसन मागे-पुढे, खाली वर करून आरामात बस चालवू शकतो.