नागपूर: प्रवाशांच्या सेवेत अहोरात्र धावपळ करणाऱ्या लालपरीचा जागोजागच्या प्रशासकीय यंत्रणांनाही चांगलाच लळा लागला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तिला दूर-दूरून बोलवणे येत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक प्रक्रियेत मोजकी धावपळ करतानाच लालपरीला मोबदला मात्र भरभरून मिळत आहे. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील जनतेची खरी सखी-सोबती म्हणून लालपरीचे अर्थात एसटी महामंडळाच्या बसचे नाव घेतले जाते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता ती अहोरात्र प्रवाशांना सेवा देत असते. नफा नुकसानीचा कसलाही विचार मनात न आणता तिची सेवा सुरू असल्याने गावोगावचे नागरिकही तिला लळा लावताना दिसतात.
अशात आता लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी देशभर सुरू आहे. मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात लालपरीचा हातभार लागावा म्हणून एसटी महामंडळाने जागोजागी नियोजन केले आहे. दुसरीकडे जागोजागच्या प्रशासकीय यंत्रणेनेही लालपरीला प्राधान्य देत तिची सेवा घेणे सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे थोडाफार प्रवासी सेवेवर परिणाम होत असला तरी दुसरीकडे कमी धावपळ करून लालपरीचा गल्ला मात्र चांगला भरत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातून २४४ बसेस नागपूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत पाठविण्यात आल्या होत्या. १८ आणि १९ एप्रिल अशी दोन दिवस सेवा देण्याच्या बदल्यात लालपरीला जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून ५३ लाख, ९२ हजार, ४०० रुपयांचा मोबदला मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरावती, अकोल्यात धावपहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील मतदार संघाात सेवा देणाऱ्या लालपरीला दुसऱ्या टप्प्यात सेवा देण्यासाठी अमरावती, अकोला येथून मागणी आली होती. त्यानुसार, नागपुरातून अमरावतीला ३३ आणि अकोला येथे ४० बसेस पाठविण्यात आल्या. तेथे २५ आणि २६ एप्रिलला सेवा दिल्यानंतर आज लालपरीची घरवापसी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अंतर अन् अमरावती, अकोल्याचे अंतर बघता तेथूनही १५ ते २० लाखांचा मोबदला लालपरीला मिळण्याची शक्यता अधिकारी वर्तवित आहेत.