तांत्रिक बिघाड करून काढली रक्कम : गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पाच तासांच्या अंतराने चोरट्यांनी तीन लाख पाच हजार रुपये काढून घेतले. दोन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची कल्पना आल्यानंतर बँक व्यवस्थापनाने बुधवारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सेंट्रल एव्हेन्यूवर एसबीआयचे एटीएम आहे. १३ जून ते १४ जून च्या मध्यरात्री दोन भामटे या एटीएममध्ये शिरले. त्यांनी पेचकसचा वापर करून एटीएममध्ये तांत्रिक बिघाड केला आणि एटीएममधील ३ लाख, ६५ हजार रुपये काढून घेतले. मध्यरात्री १२ वाजता आणि पहाटे ५ वाजता चोरट्यांनी ही चोरी केली. बुधवारी एटीएमच्या रकमेचा हिशेब जुळवताना रोकड कमी असल्याचा प्रकार बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर शाखा व्यवस्थापक मनोजकुमार रामआनंद सिंग यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
ठाणेदार भारत शिरसागर यांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन भामट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून आले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
---