मोरेश्वर मानापुरे
- शेतकऱ्यांमध्ये चिंता : मोबदला किती मिळणार, नवीन डीपीआरमध्ये होणार चित्र स्पष्ट
नागपूर : यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ६७०९ कोटींच्या प्रकल्पासाठी ५९७६ कोटींची तरतूद केल्याने हा प्रकल्प पुन्हा विकासाच्या नकाशावर आला आहे. नागपूरच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातील या प्रकल्पात जमिनीचे सर्वाधिक अधिग्रहण दक्षिण भागात अर्थात बुटीबोरीपर्यंत जाणाऱ्या मेट्रो मार्गासाठी होणार आहे. नेमकी किती शेती जाणार, मोबदला किती मिळणार यावरून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रेडिरेकनरच्या चारपट मिळावी रक्कम
दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा डीपीआर २० दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच जमिनीचे अधिग्रहण आणि अधिग्रहित होणाऱ्या जमिनीचे भाव उच्चस्तरीय बैठकीत ठरणार आहेत. पण त्यापूर्वी या मार्गावरील शेतकऱ्यांमध्ये जमीन अधिग्रहण आणि मिळणाऱ्या भावासंदर्भात चिंता आहे. या मार्गावर ले-आऊटच्या जमिनी असून एकरी कोटी रुपयांचा भाव आहे. जमीन अधिग्रहण करताना रेडिरेकनरचा भाव जमिनीला दिला जातो. पण जमिनीचा मोबदला देताना समृद्धी महामार्गाप्रमाणे चारपट किंमत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मिहान प्रकल्प तयार करताना अधिग्रहित केलेल्या जमिनीला मिळालेल्या कवडीमोल भावाप्रमाणे आमची गत होऊ नये, शिवाय तसा विलंबही होऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण या मार्गावर शासकीय आणि रेल्वेच्या जमिनीचेही अधिग्रहण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रेल्वेला समांतर राहणार मेट्रो
दुसरा टप्प्यात मिहान मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी ईएसआरपर्यंत १८.७ कि.मी.चा विस्तार होणार आहे. हा विस्तार रेल्वेला समांतर राहण्याची शक्यता आहे. याकरिता पिलर उभे करण्यात येणार आहेत. शिवाय ईको पार्क स्टेशन, मेट्रो सिटी स्टेशन, अशोकवन, डोंगरगाव, मोहगाव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलोनी, एमआयडीसी-केईसी, एमआयडीसी-ईएसआर (पाण्याची टाकी) अशी दहा स्टेशन राहणार आहेत. स्टेशनसाठीही जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे. मेट्रोने पूर्वी उभारलेल्या स्टेशनप्रमाणेच दहाही स्टेशनची रचना राहील. त्यामुळे जागेचे अधिग्रहण जास्त होणार आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या जमिनी कमी भावात अधिग्रहित होऊ नयेत, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
पूर्व, पश्चिम, उत्तर मार्गावर रस्त्यामधून जाणार रेल्वे
विस्तारात मिहान ते बुटीबोरी ईएसआरपर्यंत रेल्वे रस्त्यामधून न जाता जमिनीवर पिलर उभे करून जाणार आहे. शिवाय ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान, प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर, लोकमान्य नगर ते हिंगणा या मार्गावर रस्त्यामधून रेल्वे जाणार असल्याने जागा अधिग्रहणाचा प्रश्न नाही, शिवाय स्टेशनसाठी जागेचे आधीच अधिग्रहण करण्यात आले आहे. पण दक्षिण मार्गावर बुटीबोरीपर्यंतच्या जमिनीचे अधिग्रहण हा गंभीर विषय राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कळीचे मुद्दे...
- जमीन मार्गावर पिलर उभे राहणार
- लांबी १८.७ कि.मी. व दहा स्टेशन्स
- नवा डीपीआर २० दिवसांत येणार, त्यानंतरच मोबदल्याचा निर्णय
- उच्चस्तरीय बैठकीनंतर जमिनीचा मोबदला ठरणार
- जमीन अधिग्रहणात मिहान प्रकल्पाप्रमाणे शेतकऱ्यांची उपेक्षा होऊ नये
- समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडिरेकनरच्या चारपट मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा
-
चांगला मोबदला मिळेल
- मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मंजूर डीपीआर लवकरच येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत जमिनीचा मोबदला देण्यावर निर्णय होणार आहे. चांगला मोबदला मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात कुणीही संभ्रम पसरवू नये.
- अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क-कॉर्पोरेट).