भूमाफिया ग्वालबंशीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा दाखल : निराधार वृद्धेची तक्रार नागपूर : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना पाच-पन्नास हजार रुपये व्याजाने देऊन त्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावणाऱ्या तसेच अनेकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबंशी, त्याचे नातेवाईक आणि साथीदारांविरुद्ध गिट्टीखदान ठाण्यातही एक गुन्हा दाखल झाला आहे. रुखमाई गजानन वैद्य (वय ६०, रा. सावता मंदिरजवळ, कळमेश्वर) या वृद्धेने नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. रुखमाई यांची कळमेश्वरजवळ दीड एकर शेती आहे. आज घडीला या जमिनीची किंमत दोन ते तीन कोटी रुपये आहे. १ जानेवारी २००७ ला आरोपी दिलीप ग्वालबंशी (वय ५०) याच्याकडून रुखमाई आणि त्यांच्या मुलाने १० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात भूमाफिया दिलीप, त्याचे दोन पुतणे तसेच शरद तिवारी, नामदेव वैद्य आणि सरजू मंडपे या सर्वांनी संगनमत करून वैद्य यांच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली आणि केवळ १० हजारांच्या बदल्यात ही दोन ते तीन कोटी रुपयांची जमीन बळकावली. ही जमीन हडपण्यापूर्वी आरोपींनी गुंडांची टोळी नेऊन वैद्य यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी केली. त्याचा विरोध केला असता आरोपींनी वैद्य मायलेकांना जीवे मारण्याची धमकी दिली. वैद्य मायलेकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, तत्कालीन भ्रष्ट पोलिसांचे भूमाफिया ग्वालबंशीसोबत लागेबांधे असल्यामुळे पोलिसांनी पीडित मायलेकांनाचधमकावले. आता मात्र भूमाफिया ग्वालबंशीला पोलिसांनी अटक केल्याचे कळाल्याने पीडित रुखमाई यांनी पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांच्याकडे कैफियत मांडली. त्यावरून त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रविवारी दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अवैध सावकारी करणे, पिकाचे नुकसान करणे, जमीन बळकावणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला. भूमाफिया ग्वालबंशीने त्याचा साथीदार अप्पूच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हडपल्या आहेत. अशाच प्रकारे भूपेश चंद्रकांत सोनटक्के (वय ४२) नामक सिव्हिल इंजिनियरची जमीन हडपल्यामुळे भूपेश यांनी सहा महिन्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावरून १९ एप्रिलला मानकापूर पोलिसांनी भूमाफिया दिलीप ग्वालबंशी आणि त्याचा साथीदार राजेश माटे या दोघांना अटक करून त्यांची २४ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी मिळवली होती.दिलीपला अटक होताच अन्य पीडित तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याने त्याचा साथीदार अप्पू आणि त्याचे गुंड अन्य पीडितांना धमक्या देत फिरत आहेत. अप्पूने आपले राजकीय संबंध वापरून रविवारी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून पुढचे गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी अप्पूची गचांडी धरल्यास अनेक तक्रारकर्ते पुढे येऊ शकतात.
१० हजारात हडपली कोट्यवधींची जमीन
By admin | Published: April 25, 2017 1:27 AM