ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 3 - विकासकासोबत (डेव्हलपर्स) केलेला जमिनीचा सौदा वांद्यात आल्याचे सांगून जमिन मालकाने सशस्त्र गुंडांच्या साथीने सोमवारी अनेकांचे निवारे उध्वस्त केले. दरम्यान, पैसे देऊन भूखंड घेतल्यानंतर त्यावर उभारलेले घर डोळ्यादेखत पाडले गेल्यामुळे गेल्या ददोन दिवसांपासून संबंधितांचा आक्रोश सुरू आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम बहादुरा शिवार आहे. येथील तीन एकर जमिन सतीश सहारे नामक डेव्हलपर्सला नांदूरकर बंधूंनी २ वर्षांपूर्वी विकली होती. एक ते दीड कोटीच्या या खरेदी - विक्रीतील ३० लाख रुपये प्रारंभी सहारे यांनी जमिन मालक नांदूरकर बंधूंना दिले. त्यानंतरही काही रक्कम सहारेने जमिनमालकांना दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कागदोपत्री परवानगी घेऊन सहारेने तेथे वेगवेगळ्या क्षेत्रफळात भूखंड टाकले. त्याची वेगवेगळ्या किंमतीत अनेकांना विक्रीही केली. भूखंड विकत घेणारांनी परिस्थितीप्रमाणे आपला निवारा बांधला. अनेकांनी चांगले पक्के घरेही बांधली. दरम्यान, जमिनमालक आणि भूखंड धारकामधील कडी असलेल्या सहारेचा मृत्यू झाला. परिणामी ठरलेल्या सौद्यातील उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून जमिन मालकांनी आपली रक्कम मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार, नंतर हा वाद कोर्टातही गेला. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अचानक सोमवारी दुपारी ४ वाजता १५ ते २० सशस्त्र गुंड घेऊन विश्वनाथ बालाजी नांदुरकर, एकनाथ बालाजी नांदुरकर आणि राजेश्वर बालाजी नांदुरकर (तिघेही रा. चिटणीसनगर) जमिनीवर पोहचले. सोबत त्यांनी जेसीबीही नेला होता. त्यांनी अनेकांच्या घरावर जेसीबी चालवला. विरोध करणा-यांना नांदुरकर यांच्या सोबत असलेल्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. तब्बल दोन ते तीन तास हा हैदोस सुरू होता. डोळ्यादेखत आपले घर उध्वस्त केले जात असल्याचे पाहून संबंधितांचा आक्रोश सुरू झाला. महेश पांडुरंगजी बारापात्रे (वय ४०, रा. नाईकवाडी, पाचपावली) यांच्यासह काहींनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार बारापात्रे यांनी सक्करदरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी नांदूरकर बंधंूना सोमवारी रात्री तर प्रशांत अनिल नखाते (वय ३०, रा. साईबाबानगर, खरबी) आणि सतीश विनोद कांबळे (वय २७, रा. वाठोडा) या दोघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. पोलिसांची भूमिका संशयास्पद आरोपींनी निवारा उध्वस्त केल्यामुळे अनेकांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणे भाग पडले आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमीका संशयस्पद असल्याचा पीडितांचा आरोप आहे. पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी धावपळ केली. मात्र, दिवसभरात केवळ दोनच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. अन्य आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.
जमिनीच्या वादात भूखंडधारकांचा निवारा उध्वस्त
By admin | Published: January 03, 2017 10:30 PM