लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यातील उमरी (भरतापूर) येथे तयार करण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीमध्ये कुणीही राहत नसल्याने तिथे स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले हाेते. पाटबंधारे विभागाने ते अतिक्रमण तब्बल १२ वर्षानंतर जमीनदाेस्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. २३) करण्यात आली असून, त्यासाठी पाेलिसांची मदत घेण्यात आली हाेती.
पाटबंधारे विभागाच्या वतीने काही वर्षांपूर्वी उमरी (भरतापूर) शिवारात तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्याची साेय व्हावी म्हणून पाटबंधारे विभागाचे उमरी (भरतापूर) गावात कर्मचारी वसाहतीचेही बांधकाम केले हाेते. मात्र, येथील कर्मचारी इतरत्र स्थानांतरित झाल्याने ही वसाहत अंदाजे १२ वर्षांपासून धूळ खात हाेती. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने काही स्थानिकांनी तिथे अतिक्रमणही केले हाेते.
नवीन सर्व्हे क्रमांक ३०८, ३०९ व ३१० मध्ये (जुना सर्व्ह क्रमांक १६१ व १६३) असलेल्या या कर्मचारी वसाहतीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे यांनी अतिक्रमणधारकांना काही दिवसापूर्वी नाेटीस बजावून अतिक्रमण खाली करण्याची लेखी सूचना दिली हाेती. अशा प्रकारच्या सूचना व नाेटीस याआधीही देण्यात आल्या हाेत्या. संबंधितांनी नाेटीस प्राप्त हाेऊनही नियाेजित काळात अतिक्रमण न हटविल्याने पाटबंधारे विभागाने यावेळी मात्र प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी केळवद पाेलिसांचा चाेख बंदाेबस्तही ठेवण्यात आला हाेता. दरम्यान, पाटबंधारे विभागाने उमरी (भरतापूर) येथील संपूर्ण अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने जमीनदाेस्त करून ती जागा पुन्हा ताब्यात घेतली. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे, केळवदचे ठाणेदार दिलीप ठाकूर, पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती यादवराव ढोके, नीतेश जोगी, पंजाब राऊत, शरद हिंगणे, शाखा अभियंता योगेश जामकर, अभियांत्रिकी सहायक सुनीलसिंग राठोड, कालवा निरीक्षक विठोबा बल्की, सतीश खाडे, कोलबा मंडलिक आदी उपस्थित हाेते.