लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाकडून अवघ्या एका रुपयाच्या ‘लीज’वर जमीन घेऊनदेखील त्याचे भाडे थकविण्याचा पराक्रम शहरातील काही संस्थांनी केला आहे. अशा १२ संस्थांची यासंदर्भात शासनाकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. विधानपरिषदेत भाजप आमदार प्रवीण दटके यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
नागपुरात १०३ संस्थांनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी जमीन घेतली. मात्र त्याचा उपयोग व्यावसायिक कामासाठी होत असल्याचा आरोप दटके यांनी लावला. यातील १२ संस्थांचे भाडे थकीत आहे. उच्च न्यायालयाद्वारे गठित समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संस्थांवर ‘लीज’च्या नियम व अटींनुसार योग्य कारवाई करण्यात येईल, असे थोरात यांनी सांगितले.
शहरातील १०३ संस्थांनी शासनाकडून मिळालेल्या जमिनीचा दुरुपयोग केला आहे. एक रुपयाच्या ‘लीज’वर मिळालेली जमीन व्यावसायिक कामांसाठी वापरताच येत नाही. सरकारने या संस्थांची सखोल चौकशी करावी व सत्य समोर आणावे, असे दटके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.