लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतमालक आणि त्याच्या मुलाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत, त्यांची कोट्यवधींची जमीन हडपणारा भूमाफिया संजय आनंदराव धापोडकर १२ दिवस पोलीस कोठडीची हवा खाऊन कारागृहात पोहोचला. दरम्यान, आता त्याचे मोकाट साथीदार सक्रिय झाले असून, त्यांनी संबंधित पीडितांची मुस्कटदाबी चालविण्याची चर्चा आहे.
रवींद्र उर्फ रवी नथुजी घोडे (वय ५०) नामक शेतकऱ्याची मौजा घोरपड येथील शेती आरोपी संजय धापोडकरने कुख्यात गँगस्टर रणजीत सफेलकर आणि गुड्डू उर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर, राकेश हरिशंकर गुप्ता, नीलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे यांच्या मदतीने हडपली. त्यासाठी त्यांनी १५ जून, २००८ला फिर्यादी रवि घोडे आणि त्यांच्या मुलाचे अपहरण करून, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या १६ एकर शेतीत लेआउट टाकून त्यातील प्लॉट आरोपींनी परस्पर विकून टाकले होते. तब्बल १६ वर्षे जीवाच्या भीतीमुळे घोडे गप्प बसले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गॅंगस्टर सफेलकर आणि त्याच्या टोळीवर कडक कारवाई केल्यामुळे हिंमत करून, घोडे यांनी १४ मे रोजी नवीन कामठी पोलीस ठाण्यात सफेलकर, संजय धापोडकर,
गुड्डू उर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर, राकेश हरिशंकर गुप्ता, नीलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींना अटक करून, धापोडकरकडून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. त्याची तब्बल १२ दिवस चौकशी केली. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. धापोडकर आणि त्याचे साथीदार कारागृहात पोहोचल्यामुळे आता त्याचे मोकाट साथीदार सक्रिय झाले आहेत. धापोडकरविरुद्ध कुणी तक्रार देऊ नये, म्हणून त्यांनी अनेकांना धमकीचे निरोप दिल्याची जोरदार चर्चा आहे. हा सर्व खेळ वाडीतून सुरू असल्याचीही चर्चा असून, त्यासाठी ‘डॉन आणि हर्षाची जोडी’ सक्रिय असल्याचे समजते. पोलिसांशी मधुर संबंध असलेल्या एका दलालाचाही यात पदशील वापर करून घेतला जात असल्याची चर्चा आहे.
चांगल्या भत्त्यासाठी सेटिंगचे प्रयत्न
उत्तर नागपुरातील भूमाफिया म्हणून कुख्यात असलेल्या धापोडकरने अनेक गोरगरिबांचे, तसेच काही आजी माजी पोलीस कर्मचाऱ्यांचेही प्लॉटच्या नावाने पैसे हडप केले आहे. वरिष्ठांकडून चौकशी आणि कारवाईच्या भीतिपोटी ही मंडळी तक्रार करायला तयार नाही. दरम्यान, सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये हडपल्यानंतर धापोडकर आणि त्याचे साथीदार नेहमी मुंबईत जाऊन बारबालांवर पैसे उडवायचे. येथील काही दलालांनाही ते मोठी रक्कम महिन्याला देण (हप्ता) म्हणून देत होते. आता १२ दिवस गुन्हे शाखेच्या कोठडीत ‘गजानन महाराजांचा प्रसाद’ घेतल्यानंतर धापोडकर टोळीला कारागृहात चांगला भत्ता मिळावा, म्हणून त्याचे साथीदार सेटिंग करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.