नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी तक्रारीनंतर तातडीने कारवाई केल्यामुळे आरोपीच्या ताब्यातील भूखंड परत मिळाल्याची माहिती भूखंडमालक राजेश शेषराव ढोले यांनी दिली. झावरे यांनी आरोपी सुरेश सालकराम जाधव, प्रेमलाल सालकराम जाधव, भागवत नागोराव धनगारे आणि गंगाधर मारोतराव नक्षीने या चार आरोपींना अटक केली. या आरोपींनी मंगळवारी ढोले यांच्या बेसा येथील दोन हजार चौरस फूटाच्या प्लॉटवर सशस्त्र साथीदारांसह सुरक्षा रक्षकांना धाक दाखवून कब्जा केला. पुरावा राहू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही, डीव्हीआर आणि बोर्डची तोडफोड केली. आरोपींनी राजेंद्र ढोले यांनाही प्लॉटवर येण्यास मज्जाव केला. ढोले यांनी घटनेची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात केल्यानंतर प्रारंभी पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. पण या घटनेची माहिती झावरे यांना मिळताच त्यांनी तत्परतेने कारवाई केली. आरोपींना प्लॉटवरून बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले. ढोले यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध फुटेज आणि प्लॉटच्या रजिस्ट्रीच्या पुराव्यानंतर झावरे यांनी आरोपींना अटक केल्याचे ढोले यांनी सांगितले.
‘पीआय’मुळे भूखंड परत मिळाला
By admin | Published: June 29, 2017 2:40 AM